काँग्रेसला कोण मॅनेज होतंय पाहिलंय; शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख कोठेंचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:57 PM2019-03-22T12:57:14+5:302019-03-22T13:00:02+5:30
लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाºयांची बैठक होटगी रोडवरील एका हॉटेलमध्ये झाली.
सोलापूर: महापालिकेतील विषय समित्यांच्या वाटपाबाबत भाजपासोबत वाटाघाटी सुरू आहेत. या वाटाघाटी पूर्ण झाल्याशिवाय शिवसैनिकांनी प्रचारात सहभागी होऊ नये, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी केले. काँग्रेसला कोण मॅनेज होतंय ते मी पाहिलंय असेही कोठे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाºयांची बैठक होटगी रोडवरील एका हॉटेलमध्ये झाली. शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, प्रताप चव्हाण, सुनील शेळके, पद्माताई म्हंता, शांता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेतही आता भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे.
विषय समित्यांच्या वाटपाबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यात चर्चा झाली होती, पण या चर्चेतून तोडगा निघाला नाही. सेना पदाधिकाºयांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. जोपर्यंत वाटाघाटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रचारात सहभागी व्हायचे नाही, असा निरोप वरिष्ठ पातळीवरून देण्यात आला आहे. तोपर्यंत कुणीही प्रचारात सहभागी होऊ नका. पक्षशिस्त मोडल्यास त्यावर कारवाई होईल, असा इशाराही सावंत यांनी दिला.
या बैठकीत शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रताप चव्हाण (शहर), सुनील शेळके (शहर उत्तर), सूर्यकांत कोकटनूर (शहर मध्य), उमेश गायकवाड (शहर दक्षिण). यांची निवड झाली. यावेळी संघटकांच्याही निवडी करण्यात आल्या; तर प्रमुख पदाधिकाºयांचा समावेश असलेली शहर समन्वय समिती नेमण्यात आली.
काँग्रेसला कोण मॅनेज होतंय पाहिलंय : कोठेंचा टोला
- या बैठकीला शिवसेनेचे काही पदाधिकारी अनुपस्थित होते. या मुद्याला धरून महेश कोठे म्हणाले, भाजपावाल्यांनी परस्पर निरोप दिले तर कोणी जाऊ नका. महापालिकेतील तिढा अद्याप मिटलेला नाही. आपण ज्या पक्षात असतो त्याच्याशी नेहमी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. शिवसेनेशी कोण-कोण गद्दारी करतंय हे मी काँग्रेसमध्ये असल्यापासून पाहत आलोय. आज ही मंडळी बाहेर राहून स्वत:ची मते व्यक्त करीत आहेत. आपल्या पदाचा वापर शिवसेना वाढीसाठी करा, असेही कोठे यांनी सांगितले.