"काँग्रेसचे नेते संधिसाधू, गरिबांच्या समस्येबद्दल त्यांना काहीही देणं-घेणं नाही", माधवी लतांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 02:01 PM2024-11-11T14:01:53+5:302024-11-11T14:03:13+5:30
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी (ता. १०) माधवनगर पटांगणात आयोजित लोकजागर अभियानात माधवी लता बोलत होत्या.
सोलापूर : काँग्रेसचे नेते संधिसाधू, अवसरवादी आहेत. त्यांना गरिबांच्या समस्येबद्दल काहीही देणे घेणे नाही, अशी टीका हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांनी रविवारी केली. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी (ता. १०) माधवनगर पटांगणात आयोजित लोकजागर अभियानात माधवी लता बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, काँग्रेसच्या सर्व नेत्यांना जहागीरदारीतून सत्ता मिळाली. या नेत्यांना काहीही कमवावे लागले नाही. वरपासून खालपर्यंत सर्व नेते जहागीरदारीचे साम्राज्य चालवतात. गरिबाच्या घरात अन्न गेले आहे की नाही, त्यांना रोजगार मिळतोय की नाही याबद्दल त्यांना काहीही देणे घेणे नसते. केवळ ते जहागीरदारीची परंपरा चालवत आहेत. ज्यांना देशाची संस्कृती माहिती नाही, त्या लोकांच्या हातात अनेक वर्षे सत्ता राहिली. त्यामुळे संस्कृतीचा ऱ्हास झाला असा दावाही माधवी लता यांनी केला.
यावेळी परिषदेचे प्रांत सदस्य लक्ष्मण चव्हाण, संपर्कप्रमुख पुरुषोत्तम उडता, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, खजिनदार हितेश माधू, जिल्हा मंत्री संजय जमादार आणि बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी धर्मप्रसार प्रमुख रवी बोल्ली आदी उपस्थित होते.
हैदराबादेत वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचा भ्रष्टाचार
हैदराबाद शहरात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर गरिबांच्या वस्ती आहेत. या मालमत्ता ताब्यात घेऊन काही लोकांनी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. यातून केवळ गरिबांचे नुकसान झाले. जमिनी लाटणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे कमावले. हे थांबवण्याची हिंमत कोणामध्येही नाही, असे माधवी लता म्हणाल्या.
यावर कधी बोलणार?
माधवी लता म्हणाल्या, काही लोक पाकिस्तान आणि बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीविरोधात कधीच बोलत नाहीत. ब्रिटिशांनंतर भारतातील ब्रिटिश विचारांच्या लोकांनी भारतावर ६० वर्षे राज्य केले. तसेच, वक्फ बोर्डाच्या नावाखाली अनेक जमिनी विकल्या गेल्या. त्यावर कधी बोलणार आहात? असा सवालही माधवी लता यांनी केला.