Maharashtra Election 2019; भारत भालकेंना काँग्रेसचे तर प्रणितींना राष्ट्रवादीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:05 PM2019-10-05T12:05:19+5:302019-10-05T12:08:00+5:30
कुरघोड्या : शहर मध्यमध्ये जुबेर बागवान यांनी दाखल केला अर्ज
सोलापूर : जिल्ह्यातील काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीत ऐन निवडणुकीत बिघाडी निर्माण झाली आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी दिल्याचा राग म्हणून काँग्रेसने पंढरपुरात शिवाजीराव काळुंगे यांना ए व बी फॉर्म दिला. या खेळीला प्रत्युत्तर म्हणून शहर मध्य मतदारसंघात राष्ट्रवादीने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जुबेर बागवान यांना गुरुवारी अखेरच्या क्षणी अर्ज भरायला लावला.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकापची आघाडी झाली आहे. आघाडी जाहीर होण्यापूर्वी पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने पंढरपुरातून भालके यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली. पंढरपूर मतदारसंघात आघाडीत बिघाडी निर्माण झाली. काँग्रेसच्या या खेळीला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना आव्हान देण्याची तयारी केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगण्यात आले. बागवान यांनी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक किसन जाधव यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
ही आघाडी आम्हाला समजली नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता भारत भालके यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. पंढरपूरची जागा काँग्रेसकडे होती. ती राष्ट्रवादीला सोडायची गरज वाटत नाही. प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अर्ज दाखल केला असला तरी आमची हरकत नाही. वरिष्ठ नेते ते पाहून घेतील. शेकापसोबत आघाडी असताना दीपक साळुंखे यांनी सांगोल्यात अर्ज दाखल केला आहेच ना.
- प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस