सत्तेची मुजोरी होती म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने नाकारले : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 08:28 PM2019-09-01T20:28:15+5:302019-09-01T20:31:30+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये विरोधकांच्या ईव्हीएमवरील टीकेवरून शरसंधान साधले.
सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप यात्रेवेळी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपाचा झेंडा दिला. याचबरोबर जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे नातेवाईक राणा जगजित सिंह यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये विरोधकांच्या ईव्हीएमवरील टीकेवरून शरसंधान साधले. सत्तेची मुजोरी होती म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने नाकारले. बारामतीत सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं, तर सोलापुरात जय सिद्धेश्वर महास्वामी निवडून आले तर ईव्हीएम वाईट असे कसं, असा सवालही उपस्थित करत परिक्षेला नापास झालेल्या मुलाचे उदाहरण दिले. 2004 ते 2014 च्या निवडणुका ईव्हीवर झाल्या. तेव्हा ईव्हीएम खराब नव्हते का, मोदी जिंकल्यावरच ईव्हीएम खराब झाल्याची ओरड मारू लागल्याचा आरोप त्यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रातले सत्ताधारी असूनही तेथील एकही प्रकल्प पूर्ण करू शकले नाहीत. आम्ही हे प्रकल्प पूर्ण केले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण करून दाखवू. कोकणात वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागाला वळविण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तिजोरी नेहमीच खुली केली, असेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच पुन्हा भाजप महायुतीचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यात्रा का काढली?
विरोधकांची झोप उडवणारी महाजनादेश यात्रा आहे. पाच वर्षात काय केले याचा हिशोब देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढलेली आहे. आभार मानण्यासाठी, हिशोब देण्यासाठी, सूचना मागण्यासाठी ही यात्रा काढल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या पक्षातील आमदार-खासदार हे भाजप-शिवसेनेचे जात असल्यामुळे शरद पवार यांचा त्रागा झाला त्यामुळेच पत्रकारांवर ते चिडले अशी टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे काय पोर आहेत का, असा सवालही केला.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे लवकरच करणार भाजप प्रवेश करतील. विरोधकांना नेहमीच जातीच राजकारण दिसतं, असेही पाटील यांनी सांगितले.