काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा
By admin | Published: May 24, 2014 01:11 AM2014-05-24T01:11:04+5:302014-05-24T01:11:04+5:30
चिंतन बैठकीत हाणामारी : पोलिसाला मारहाण: खुर्च्यांची तोडफोड
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवामुळे आत्मचिंतन करण्यासाठी डफरीन चौक येथील सारस्वत मंगल कार्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी केशव इंगळे यांच्या डोक्यात खुर्ची घातल्याने ते जखमी झाले तर पोलिसालाही खुर्च्या फेकून मारण्यात आले. निवडणुकीत अपयश आल्याने बैठकीत घातलेल्या गोंधळामुळे काँग्रेसची संस्कृती ढासळल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांचा दीड लाख मतांनी पराभव झाला. या अपयशाची जबाबदारी स्वीकारत शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्यासह काही पदाधिकार्यांनी प्रदेश कार्यकारिणीकडे आपले राजीनामे पाठविले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाला काँग्रेसमधील गटबाजी कारणीभूत आहे़ यावर आत्मचिंतन करण्यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी शुक्रवारी सायं.५.३0 वा. बैठक बोलावली होती. या बैठकीस व्यासपीठावर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन कामत, जनरल सेक्रेटरी केशव इंगळे, अजय दासरी, बजरंग जाधव, अशोक चव्हाण, शहर उपाध्यक्ष अनिल मस्के आदी नेते उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर काही कार्यकर्त्यांनी ही बैठक कशासाठी बोलावली आहे, असे विचारत जमलेल्या लोकांना दमदाटी केली होती. त्यानंतर काही काळ गेल्यावर बैठकीस सुरूवात झाली. बैठक सुरू होताच धर्मा भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी ही बैठक कशासाठी बोलावली ते सांगा, अशी विचारणा केली. तेव्हा राजन कामत यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव कशामुळे झाला यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आल्याचे सांगितले. तेव्हा संतप्त झालेल्या धर्मा भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी या पराभवाला तुम्हीच लोक कारणीभूत आहात, तुमच्यामुळेच शिंदेसाहेब पडले, आमदार प्रणिती शिंदे यांचे पदही धोक्यात आले आहे, असे म्हणत व्यासपीठावरील टेबल पाडण्यास सुरूवात केली. अन्य कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली तर फायबरच्या खुर्च्या हाताने आपटून तोडण्यात आल्या. हा प्रकार सुरू असताना पोलीस आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण करीत होते तेव्हा याच कार्यकर्त्यांनी दोन खुर्च्या फेकून मारल्या. त्यांच्या हातातील मोबाईल घेऊन जमिनीवर आपटून फोडण्यात आला. अचानक गोंधळ वाढल्याने वातावरण तंग झाले़ दरम्यान याच कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी केशव इंगळे यांच्या डोक्यात खुर्ची फेकून मारली़ त्यामुळे ते जमिनीवर पडले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करीत मारहाण करणार्या चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती आटोक्यात आणली.
-------------------------------
सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवामुळे आम्ही त्याची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. मात्र कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे गुंडगिरीचे वर्तन करून बैठक उधळून लावत मला मारहाण केली. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांकडून झालेला प्रकार योग्य नाही. - केशव इंगळे, जनरल सेक्रेटरी, काँग्रेस कमिटी.
----------------------------------------------
निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे नियोजन नव्हते त्यामुळे सुशीलकुमार शिंदे साहेबांचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला आहे. भविष्यातील विधानसभेच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी आम्ही जमलो होतो मात्र गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी आम्हा निष्ठावंतांवर हल्ला केला आहे. या प्रवृत्तीचा मी निषेध करतो. - अजय दासरी, काँग्रेस कार्यकर्ते.
---------------------------------------
स्थानिक नेते जबाबदार ! लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाला स्थानिक नेते जबाबदार आहेत. यावर विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती, मात्र शहराध्यक्ष धर्मा भोसले आणि महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालून बैठक उधळली आहे, असा आरोप काही कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
-----------------------------------
सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव ही सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे. वास्तविक पाहता अशा प्रकारची बैठक घेण्याचा कसलाही अधिकार या कार्यकर्त्यांना जात नाही. जे काही असेल ते वरिष्ठांच्या आणि शिंदे साहेबांच्या समोर मत व्यक्त करणे गरजेचे होते. माझ्या सोबत काम करणारा एकही कार्यकर्ता तेथे नव्हता. आपण सर्व एकच आहोत, आपणच आपल्या भावावर हात उगारणे योग्य नाही. कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी आणि पुन्हा काँग्रेसची ताकद कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रीत करावे. -चंद्रकांत दायमा, प्रदेशाध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, सोलापूर.
------------------------------------------------------
मी बैठकीसाठी मुंबईमध्ये आहे, माझा या घटनेशी कसलाही संबंध नाही. सर्व कार्यकर्ते माझेच आहेत, पण त्यांना अशा पद्धतीची बैठक घेण्याचा अधिकार नाही. मारामारी ही आमची संस्कृती नाही, मी वारकरी सांप्रदायातील व्यक्ती आहे. माझा राजीनामा मान्य करण्यात आलेला नाही. - धर्मा भोसले, शहराध्यक्ष, काँग्रेस कमिटी, सोलापूर.