१६०० रूपयाची लाच स्वीकारताना पंढरपूर भिमा पाटबंधारे विभागातील भांडारपाल जाळ्यात, सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:50 PM2018-01-04T15:50:26+5:302018-01-04T15:51:50+5:30
कार्यालयाच्या सिंचन वसुलीसाठी भाड्याने लावलेल्या जीपच्या भाड्याची रक्कम मंजूर करून ती संबंधितांना देण्यासाठी पंढरपूर येथील भिमा पाटबंधारे विभागातील सहाय्यक भांडारपाल संगप्पा शंकर आलेकर (वय ३०) यांना लाचेची मागणी करून ती स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ४ : कार्यालयाच्या सिंचन वसुलीसाठी भाड्याने लावलेल्या जीपच्या भाड्याची रक्कम मंजूर करून ती संबंधितांना देण्यासाठी पंढरपूर येथील भिमा पाटबंधारे विभागातील सहाय्यक भांडारपाल संगप्पा शंकर आलेकर (वय ३०) यांना लाचेची मागणी करून ती स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़
तक्रारदार हे पंढरपूर येथील भिमा विकास उपविभाग क्र ४ येथे लिपीक म्हणून नोकरीस आहेत़ त्यांनी उपविभागाचे वसुली करण्यासाठी जीप क्रमांक एमएच ४५ ए ७५३५ ही भाड्याने लावली होती़ सदर जीपच्या भाड्याचे बील तयार करून ते लिपीक आलेकर यांच्या कार्यालयास मंजूरीसाठी पाठवले होते़ सदरचे बील मंजूर करून ती रक्कम अदा करण्यासाठी लिपीक आलेकर हे तक्रारदार चव्हाण यांना लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी १५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयाकडे तक्रार दिली होती़ त्यावरून १५ सप्टेंबर २०१७ रोजी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराच्या तक्रारीची खात्री केली असता लिपीक आलेकर बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी १६०० रूपये लाचेची मागणी केली होती़ सदर लाचेची रक्कम ४ जानेवारी २०१८ रोजी भिमा पाटबंधारे विकास कार्यालयात स्वीकारताना आलेकर यांना रंगेहाथ पकडले़
याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात संगप्पा शंकर आलेकर (वय ३० वर्षे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे़ ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहा़ पोलीस आयुक्त तथा पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर यांच्या पथकाने केली़