सापटणे पंपावरील डिझेल चोरांचे कनेक्शन मध्यप्रदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:16 AM2021-07-01T04:16:33+5:302021-07-01T04:16:33+5:30
सोनू पिरूलाल जगांले (वय २९), ब्रिजमोहन गजराजसिंग ठाकूर (वय २४), गोलू प्रेम चौव्हाण (वय २३ ), विवेक शैलेंद्र मकवाना ...
सोनू पिरूलाल जगांले (वय २९), ब्रिजमोहन गजराजसिंग ठाकूर (वय २४), गोलू प्रेम चौव्हाण (वय २३ ), विवेक शैलेंद्र मकवाना (वय १९) व शामसुंदर राजेंद्र साहू (वय २९, सर्व रा. इंदोर) या पाचही आरोपींना भादंवि कलम ३९५ नुसार अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार ६ जून २०२१ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास सापटणे (टें) येथील गजलक्ष्मी पेट्रोल पंपामध्ये झोपलेले प्रदीप तानाजी पाटील (रा. अरण) यांना एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून आलेल्या चार अनोळखींनी चाकूचा धाक दाखवून पंपातील ५८ हजार ६३८ रुपयांचे ६३८ लीटर डिझेल व एक मोबाईल चोरून नेला होता. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास फौजदार पी. व्ही. काशीद करीत होते.
-----
दोन पथकांद्वारे कामगिरी
या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे व फौजदार काशीद यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली. तपासात खबऱ्याकडून मिळालेली माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या गुन्ह्यांमध्ये मध्यप्रदेशातील इंदूर शहरातील ५ तरुणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची खात्री झाल्यानंतर टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे, फौजदार काशीद, पोलीस नाईक संजय भानवसे, पोलीस प्रसाद अनभुले यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे काम केले. हा गुन्हा उघडकीस आल्यामुळे यापूर्वी या भागात झालेल्या अनेक गुन्ह्याचा शोध लागण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व पोलीस उपअधीक्षक डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
----