सोलापूर जिल्ह्यात १८,२८१ कृषिपंपाना नवीन वीज जोडण्या
By काशिनाथ वाघमारे | Published: April 9, 2023 03:13 PM2023-04-09T15:13:11+5:302023-04-09T15:17:10+5:30
आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात एकूण ५९ हजार ८९५ शेतक-यांच्या कृषिपंपाला नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात एकूण ५९ हजार ८९५ शेतक-यांच्या कृषिपंपाला नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १८, ३९१ नवीन कृषिपंपाना वीज जोडण्या तर सोलापूर जिल्ह्यात १८, २८१, पुणे जिल्ह्यात १३००५ आणि सांगली जिल्ह्यात ११, ६१९ व सातारा जिल्ह्यात १०, २१८ कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या राज्याच्या कृषिपंप वीज जोडणी उद्दीष्टाच्या ३७ टक्के वीज जोडणी पुणे प्रादेशिक विभागात झाली आहे. मागेल त्याला त्वरित वीज जोडणी देण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. जिथे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा सर्व्हिस कनेक्शनला त्वरित वीज जोडणी देण्यात येत आहे. आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापरू नये. वीज जोडणीसाठी शेतक-यांनी अर्ज केल्यास त्वरित वीज जोडणी देण्याची मोहीम हाती घेतली आहे.
नवीन कृषिपंप धोरण २०२० नुसार शेतकऱ्यांना थकीत बिल भरण्यात सवलत दिली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ या कालावधीत कृषिपंपाच्या थकीत विजबिलावर २० टक्के सवलत दिली असल्याची माहिती पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"