वर्षभरात पुणे प्रादेशिक विभागात ५९८९५ कृषिपंपाना नवीन वीज जोडण्या
By दिपक दुपारगुडे | Published: April 5, 2023 07:28 PM2023-04-05T19:28:03+5:302023-04-05T19:28:45+5:30
मागेल त्याला त्वरित वीज जोडणी देण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.
दीपक दुपारगुडे
सोलापूर : आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात एकूण ५९ हजार ८९५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात १८३९१ नवीन कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात आल्या तर सोलापूर जिल्ह्यात १८२८१, पुणे जिल्ह्यात १३००५, सांगली जिल्ह्यात ११६१९ व सातारा जिल्ह्यात १०२१८ कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या राज्याच्या कृषिपंप वीज जोडणी उद्दीष्टाच्या ३७ टक्के वीज जोडणी पुणे प्रादेशिक विभागात झालेली आहे.
मागेल त्याला त्वरित वीज जोडणी देण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. जिथे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा सर्व्हिस कनेक्शनला त्वरित वीज जोडणी देण्यात येत आहे. आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापरू नये. वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्वरित वीज जोडणी देण्यात येईल. नवीन कृषिपंप धोरण २०२० नुसार शेतकऱ्यांना थकीत बिल भरण्यात सवलत दिलेली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ या कालावधीत कृषिपंपाच्या थकीत विजबिलावर २० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले चालू व थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.