शेट्टींच्या दूध आंदोलनाचं कनेक्शन मातोश्रीवर, रिमोट मात्र बारामतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 02:16 PM2020-08-20T14:16:10+5:302020-08-20T14:22:44+5:30
भाजपाची टीका; दूध आंदोलनावरून पेटला वाद
सोलापूर : आमदारकी पदरात पाडण्यासाठी राजू शेट्टी यांनी दूध आंदोलनाचा घाट घातला आहे. मुंबईकडे जाणारे दूध रोखून धरण्यापेक्षा मातोश्रीवर जाणारे दूध बंद करा. मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री हेच शेट्टी यांचे बोलवते धनी असून राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाचं कनेक्शन मातोश्रीवर तर रिमोट बारामतीत असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली.
दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नुकताच सोलापुरात मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर देशमुख म्हणाले, सोलापूर येथे आंदोलनाला परवानगी नसताना सरकारच्या आशीर्वादाने सुपारी घेऊन आंदोलनाचे निमित्त करून शेतकºयांना गंडवण्याचे दुकान राजू शेट्टी यांनी उघडले आहे.
राज्यात भाजप प्रबळ विरोधक झाला असून भाजपला राज्यातील शेतकºयांनी विधानसभेच्या निवडणुकीत भरभरून मते दिली आहेत आणि सर्वाधिक जागा देखील निवडून दिल्या आहेत. याचा रोष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या मनात खदखदत आहे. सत्तेत येताच तोच रोष आघाडी सरकारने शेतकºयावर काढला आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला.