स्मार्ट सिटीच्या कामकाजात लोकप्रतिनिधींच्या सूचनांही विचारात घ्या : सहकारमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:55 PM2018-05-25T16:55:56+5:302018-05-25T16:55:56+5:30
सोलापूर :- स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामकाजात लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार केला जावा, अशा सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिल्या.
स्मार्ट सिटी अॅडव्हायजरी फोरमची शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी प्रकल्पातील विकास कामांची आखणी करताना त्याबाबत लोकप्रतिनिधींची मते जाणून घ्या. त्यांच्या मतानूसार आणि विचार विनिमय करुन विकास कामे केली जावीत. देशमुख यांनी सांगितले की, महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी प्रकल्पासाठीच्या सल्लागार कंपन्या यांच्यात समन्वयाची आवश्यकता आहे. हा समन्वय ठेवून कामांची गती वाढवल्यास सोलापूरच्या लौकीकात भर पडेल. स्मार्ट सिटी प्रकल्पातील उर्वरित कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले जावेत. त्याच्या निविदा काढल्या जाव्यात.
ढाकणे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत झालेल्या विविध कामांचा माहिती दिली. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, चैतन नरोटे यांच्याबरोबरच भारत संचार निगम लिमिटेड, महावितरण आदी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.