सोलापूर जिल्हा संघ दूध संकलन बंद करण्याच्या विचारात, प्रशांत परिचारक यांची माहिती, २७ रुपयांनी खरेदी तर विक्री २० रुपयांनी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 09:39 AM2018-01-06T09:39:17+5:302018-01-06T09:41:59+5:30
दुधाचे दर अधिकच घसरल्याने सहकारी दूध संघ चालविणे कठीण झाले असून, पर्यायाने संकलन आठवड्यातून काही दिवस बंद करावे लागेल, असा इशारा सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : दुधाचे दर अधिकच घसरल्याने सहकारी दूध संघ चालविणे कठीण झाले असून, पर्यायाने संकलन आठवड्यातून काही दिवस बंद करावे लागेल, असा इशारा सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिला आहे.
राज्य शासनाने २१ जून २०१७ पासून दूध खरेदी दरात वाढ केली आहे. गाईच्या दुधाचा दर प्रतिलिटर २७ रुपये व म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ३६ रुपये इतका केला आहे. सहकारी संघाला हा दर देणे बंधनकारक केल्याने आम्हाला ३.५ / ८.५ दुधाला शासन आदेशाप्रमाणे दर द्यावा लागतो आहे. वरचेवर बाजारातील दूध विक्रीचा दर घसरत असल्याने संकलन केलेल्या दुधाची विक्री करणे कठीण झाले असल्याचे संघाचे अध्यक्ष आ. परिचारक यांनी सांगितले. सध्या दूध संघाचे संकलन एक लाख २५ हजार लिटर प्रतिदिन होत असून, त्यापैकी ५० हजार लिटर दूध पॅकिंगमधून विक्री केले जाते, उर्वरित दूध विक्रीसाठी दररोज अडचणीचे होत आहे.
संकलन होणाºया दुधापैकी शिल्लक राहणारे दूध महानंद जानेवारीपासून २० रुपये लिटरने खरेदी करु लागला आहे. शासन अंकित महानंद जर गाईचे दूध प्रतिलिटर २० रुपयाने खरेदी करु लागला तर शेतकºयांना आम्ही किती दर द्यावा?, असा प्रश्न परिचारक यांनी विचारला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून खासगी संघ व दूध पंढरीच्या दूध खरेदीत व विक्रीत मोठी तफावत असल्याने संघाला दररोज दीड लाख रुपयाचा तोटा सहन करावा लागत असून, यावर सातत्याने शासन पातळीवर चर्चा करुनही मार्ग निघत नाही. शासन सहकारी संघाला वाढीव दर देणे बंधनकारक करीत असताना खासगी संघ त्यांना वाटेल त्या दराने दूध खरेदी करीत आहे. यावर शासन काहीच निर्णय घेत नसल्याने आता तोटा सहन करणे कठीण असल्याचे संघाचे अध्यक्ष परिचारक यांनी म्हटले आहे.
---------------------------
समितीचा अहवाल गुलदस्त्यातच...?
- दूध वाढीच्या कालावधीत अतिरिक्त दुधाची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते. यावर्षी मागणीपेक्षा अधिक दूध संकलन होत असल्याने व विक्रीची व्यवस्था नसल्याने सहकारी दूध संघासमोर दूध विक्रीची अडचण आहे. यासाठी नोव्हेंबर महिन्यात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अधिकाºयांची समिती नेमली होती. पशुसंवर्धन सचिव विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये महानंदचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे व दुग्ध आयुक्त राजेंद्र जाधव यांचा समावेश होता. या समितीने राज्यातील एकूणच दुधावर अहवाल तयार करून द्यावयाचा होता. समितीचे अध्यक्ष विकास देशमुख हे सेवानिवृत्त झाले असून जाता-जाता त्यांनी अहवाल दिला असल्याचे सांगण्यात आले. हा अहवाल गुलदस्त्यातच आहे.
-----------------------
ंअनुदानही मिळेना
- शेजारच्या कर्नाटक राज्यात सहकारी दूध संघ दुधाला त्या-त्या परिस्थितीप्रमाणे दर देतो. शासन सहकारी संघाला दूध घातलेल्या शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपयाप्रमाणे रक्कम जमा करते. यामुळे कर्नाटकमध्ये जवळपास संपूर्ण दूध शासकीय डेअरीला जमा होते. अशाच पद्धतीने अन्य राज्यातही शासन सहकारी संघाला दूध घालणाºया शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करतात. महाराष्टÑातही अशाच पद्धतीने अनुदानाची मागणी राज्यातील सहकारी संघांनी केली असली तरी त्याचा विचार शासनाने केला नाही.