सोलापुरात उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी सिग्नल राहणार बंद
By शीतलकुमार कांबळे | Published: April 4, 2024 05:08 PM2024-04-04T17:08:57+5:302024-04-04T17:10:11+5:30
दिवसेंदिवस सोलापूरचे तापमान वाढत असून बुधवार ३ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके होते.
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : दिवसेंदिवस सोलापूरचेतापमान वाढत असून बुधवार ३ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके होते. या वाढत्या उन्हाचा विचार करुन वाहतूक शाखेकडून दुपारी १२ ते ५ दरम्यान शहरातील सिग्नल बंद करण्यात येत आहेत. यासाठी अंमलबजावणी सुरु झाली आहे.
शहरात विविध ठिकाणी एकूण २० सिग्नल आहेत. यातील काही स्वयंचलित आहेत. वाहनचालक शहरातून जात असताना सिग्नल लागल्यास त्याला उन सहन करत थांबावे लागते. काही वाहन चालक तर उन्हापासून वाचण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत. त्यातच हवामान विभागाने उष्णतेच्या लाटाचा इशारा दिला आहे. सिग्नलवर उन्हात उशीरा थांबल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये दुपारी सिग्नल बंद करतात. या वर्षी एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
अवजड वाहनांची वाहतूक असणारे चौक म्हणजजेच शांती चौक, जुना बोरामणी नाका, अक्कलकोट नाका, आसरा चौक या ठिकाणी सिग्नल वाहतुकीची परिस्थिती पाहून सुरु किंवा बंद करण्यात येणार आहेत. उन वाढल्यामुळे उष्णतेचे विकार होऊ नये, उन्हात नागरिकांना सिग्नलवर तिष्टत थांबावे लागू नये यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार दुपारी १२ ते ५ दरम्यान सिग्नल बंद राहणार आहे, असे पोलिस निरिक्षक धनाजी शिंगाडे, तानाजी दराडे यांनी सांगितले.