कुर्डूवाडीकरांना दिलासा.. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:20 AM2021-05-01T04:20:38+5:302021-05-01T04:20:38+5:30

कुर्डूवाडी शहरात गेल्या महिन्यात सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्स न राखता गर्दी होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिलमध्ये ...

Consolation to Kurduwadikars .. Decrease in the number of positive patients | कुर्डूवाडीकरांना दिलासा.. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

कुर्डूवाडीकरांना दिलासा.. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

googlenewsNext

कुर्डूवाडी शहरात गेल्या महिन्यात सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्स न राखता गर्दी होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिलमध्ये शहरात ३७९ रुग्ण बाधित आढळले. त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार येथील वेगवेगळ्या कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधून मिळाल्याने मात्र बाधित रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही येथून वाढल्याचे दिसून आले. दरम्यानच्या काळात शहरात अनेक कडक उपाययोजना केल्याने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील रुग्ण संख्याही तपासणीत अगदी नगण्य आली आहे. मृत्यूदर तर शून्यावरच आला आहे.

एकूण ३७९ बाधित रुग्णांपैकी २०३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत, तर १६२ रुग्ण सध्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी अजूनही कोविडसंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले, तर आठवड्यातच कुर्डूवाडी शहर कोरोनामुक्त होईल असा आशावाद मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

कुर्डूवाडी शहरात व परिसरात दररोज तीस- चाळीस रुग्ण बाधित होऊ लागल्याने नगरपालिका प्रशासनावरही ताण आला होता. यावेळी नगराध्यक्ष समीर मुलाणी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे व मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या बरोबरच सर्व नगरसेवक व फिल्डवरच्या कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे अंमलबजावणी सुरू केली. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई केली. यादरम्यान शहरातील नागरिकांची कोविड तपासणी वाढविली गेली. या सर्व प्रयत्नामुळे कुर्डूवाडीकरांना दिलासा मिळू लागला आहे.

---

या उपाययोजना ठरल्या यशस्वी

एका शाळेत कायमस्वरूपी कोविड तपासणी सेंटर उभे केले, तर दुसरे मोबाइल तपासणी सेंटरही शहरातून कार्यरत ठेवले. त्याचबरोबर येथील रेल्वे स्टेशनवरही पॅसेंजर लोकांची कोविड तपासणी सुरू केली. यामुळे पहिल्यांदा खूपच बाधित रुग्ण सापडू लागले. त्यावर उपाययोजना करण्यासाठी वेळही मिळू लागला. याद्वारे यंत्रणा अधिक सतर्क झाल्याने मोकाट फिरणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली.

नगरपालिकेच्या वतीने शहरातील फळे व भाज्या विक्रेत्यांच्या मुख्य बाजार आवाराचे विभाजन करून ते चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केले. त्यामुळे भाजीपाला आणण्यासाठी जाणाऱ्या लोकांचीही गर्दी यामुळे कमी झाली.

येथील शिक्षकांच्या पथकांद्वारे घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागामार्फत सहा पथके करून वाॅर्डनिहाय स्वच्छता व इतर तपासणी दररोज करण्यात आल्या.

खाजगी दवाखाने, सार्वजनिक ठिकाणी, शहरातील मुख्य बाजारपेठा या जागादेखील फवारणी करून स्वच्छ व निरोगी करण्यात आल्या. म्हणून कोरोना रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी यश मिळाले आहे.

----

कोरोना महामारीच्या काळात अजूनही स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. आम्ही घेतलेल्या काही कडक धोरणांमुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही कमी होऊ लागली आहे. त्याला शहरवासीयांनी साथ दिली, तर आठवडाभरात आपले शहर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल.

- समीर भूमकर, मुख्याधिकारी, नगरपालिका कुर्डूवाडी.

Web Title: Consolation to Kurduwadikars .. Decrease in the number of positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.