बंडातात्या कराडकरांनाही संपवण्याचा रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:10 AM2020-01-09T05:10:46+5:302020-01-09T05:10:53+5:30
मठाधिपतीपद देण्यासाठी विरोध केल्याने ह. भ. प. बंडातात्या कराडकर आणि ह. भ. प. जयवंत पिसाळ या दोघांना संपवण्याचा कट रचला होता.
पंढरपूर (जि. सोलापूर): मठाधिपतीपद देण्यासाठी विरोध केल्याने ह. भ. प. बंडातात्या कराडकर आणि ह. भ. प. जयवंत पिसाळ या दोघांना संपवण्याचा कट रचला होता. मात्र ह. भ. प. बंडातात्या कराडकर त्याठिकाणी नसल्याने त्यांचे प्राण वाचल्याची माहिती तपासात समोर आल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
वारकरी संप्रदाय आणि पालखी सोहळ्यात कराडकर दिंडीला मानाचे स्थान आहे. बंडातात्या कराडकर आणि जयवंत पिसाळ या दोघांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप करुन मठाधिपतीपदावरून मला खाली खेचले. मठामध्ये कीर्तन करण्याची परवानगी देखील देत नव्हते. या अपमानाचा बदला म्हणून बंडातात्या अन् जयवंतला संपविण्याचा निर्णय घेतला होता, असे बाजीराव जगताप-कराडकर याने सांगितले.
सोमवारी पुत्रदा एकादशीनिमित्त ह. भ. प. बंडातात्या आणि जयवंत पिसाळ हे दोघेही पंढरपूर मुक्कामी येणार हे बाजीराव जाणून होता. ही संधी साधून बाजीरावने मठामध्ये कीर्तन करण्याची परवानगी मागितली. परवानगी देण्यावरुन जयवंत महाराज आणि बाजीराव यांच्यात दशमीदिवशी वाद झाला. पण काही मंडळींनी मध्यस्थी करुन तो वाद मिटवला.
या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बाजीरावने द्वादशीला दोघांना संपवण्याचा कट रचला होता. परंतु बंडातात्यांनी एक दिवस आधीच पंढरपूर सोडल्याने ते माझ्या तावडीतून सुटले अन् जयवंत पिसाळ एकटाच सापडला, अशी माहिती बाजीराव जगताप याने पोलिसांना दिली, असे अतुल झेंडे यांनी सांगितले.
>पाच दिवसांची पोलीस कोठडी
ह. भ. प. जयवंत हिंदुराव पिसाळ (रा. लवंडमाची, ता. वाळवा, जि. सांगली) यांचा खून केल्याप्रकरणी बाजीराव जगताप याला बुधवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.