अटक न करता सोडून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी हवालदारास अटक; खासगी व्यक्तीवरही गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Updated: June 27, 2024 19:03 IST2024-06-27T19:02:03+5:302024-06-27T19:03:29+5:30
ॲन्टी करप्शनच्या पथकाने पडताळणी करुन ही कारवाई केली.

अटक न करता सोडून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी हवालदारास अटक; खासगी व्यक्तीवरही गुन्हा दाखल
सोलापूर : पोलीस ठाण्यात आयपीसी ३२५ च्या गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करुन सोडून देण्यासाठी खासगी व्यक्तीकरवी १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हवालदारासह दोघांना अटक करण्यात आली. ॲन्टी करप्शनच्या पथकाने पडताळणी करुन ही कारवाई केली.
किरण देवीदास म्हेत्रे (वय- ४६, हवालदार, अरविंद धाम पोलीस वसाहत, सोलापूर) आणि रोहित नागेश गवड (वय ३३, रा. द. कसबा, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम, ७, ७ अ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यातील तक्रारदार व त्याच्या मामेभावाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात आयपीसी ३२५ अन्ये गुन्हा दाखल असल्याचे नमूद हवालदार म्हेत्रे यांनी त्याला सांगितले. या गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करुन सोडून देतो, यासाठी खासगी इसमाकरवी २५ हजार रुपयांची मागणी केली.
तडजोडीअंती ही रक्कम १० हजार रुपयांवर आणली गेली. यानंतर तक्रारदाराने लाच लुुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयालयाकडे संर्प र्क साधून तक्रार देण्यात आली. पथकाकडून २४ जून रोजी पडताळणी करण्यात आली, त्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावण्यात आला. २६ जूनच्या रात्री उशिरानंतर नमूद लोकसेवक हवालदार या सापळ्यात अलगद अडकला. पथकाकडून शहानिशा केली असता हवालदाराने लाच स्वीकारल्याची मान्य केले. सदरची लाच खासगी इसमाच्या हस्ते स्वीकारली असल्याने दोघांना ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदवण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डा. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, हवालदार शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे, रवी हाटखिळे, राहूल गायकवाड यांनी पार पाडली.
.. तर थेट तक्रार करा
कोणत्याची कामासाठी पैसा घेणे हे कायद्यानुसार गुन्हा ठरतो. अशा प्रकारे लाच मागितल्यास संबंधी लोकसेवक अथवा त्याच्या वतीने लाच मागणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्यासाठी टोल फ्री नं. १०६४ अथवा ०२१७ - २३१२६६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केले आहे.