मतदारसंघ सेनेचा; इच्छुक भाजपचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 02:54 PM2019-05-30T14:54:52+5:302019-05-30T14:58:58+5:30
सोलापूर शहर मध्य विधानसभा; भारतीय जनता पक्षाला अनपेक्षितपणे मिळालेल्या मताधिक्यामुळे वाढली इच्छुकांची गर्दी
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे भाजपला मताधिक्य देणाºया शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आता इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. मतदारसंघ शिवसेनेचा अन् भाऊगर्दी मात्र भाजपच्या इच्छुकांची अशी स्थिती ‘मध्य’ मध्ये निर्माण झाली आहे. सलग दोनवेळा काँग्रेसचा गड कायम राखण्यात यशस्वी झालेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना जवळपास ३८ हजारांचे मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे.
भाजपला एकगठ्ठा मतदान होण्याची कारणे वेगवेगळी सांगितली जात असली तरी आता विधानसभेचे गणित मात्र याच मताधिक्यावर मांडले जात आहे. भाजप-सेना युती कायम राहिली तर हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे निश्ंिचत झाले आहेत. युती कायम राहिल्यास आपली आमदारकी दूर नाही, असा त्यांना आतापासून विश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे कोठे गटाने त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या पारड्यातील मतांची बेरीज करून शिवसेना शहर मध्यमध्ये आपली ताकद लावण्यासाठी पुढे सरसावली आहे.
भाजपमध्येही शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू आहे. पांडुरंग दिड्डी, रामचंद्र जन्नू, मोहिनी पतकी, शहाजी पवार, अविनाश महागावकर, नागेश वल्याळ यांची नावे चर्चेत आहेत. गेल्या वेळेस भाजप-सेना युती झाली नाही. त्यामुळे मोहिनी पतकी, महेश कोठे यांच्यात मतविभागणी झाली. त्यामुळे एमआयएमचे उमेदवार तौफिक शेख यांना अधिक मते मिळाली, पण या वेळेस एमआयएमचा कोण उमेदवार राहणार हे निश्चित नाही. माकपचे आमदार आडम मास्तर हेही याच मतदारसंघात पुन्हा इच्छुक आहेत. गेल्या वेळेस काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली नव्हती. या वेळेस मात्र आघाडी कायम राहणार, अशी चिन्हे दिसत असली तरी विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
भाजपमध्ये होणार वाटाघाटी
- लोकसभेला भाजप-सेनेची युती झाली असली तरी विधानसभेला ती कायम राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण विधानसभेला जागा वाटपाचा कळीचा मुद्दा उपस्थित होणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला सध्या करमाळा आहे. मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, शहर मध्य, माढा हे विधानसभा मतदारसंघ मिळावेत, अशी सेनेची मागणी राहणार आहे. दक्षिण सोलापुरात सध्या सहकारमंत्री सुभाष देशमुख हे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला देणे शक्य होणार नाही.
मागील विधानसभेचे चित्र
- सन २००९ मध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना ६८ हजार २८ तर माकपचे नरसय्या आडम यांना ३४ हजार ६६४ मते मिळाली. तर २०१४ मध्ये शिंदे यांना ४६ हजार ९०७ तर एमआयएमचे तौफिक शेख यांना ३७ हजार १३८ इतकी मते मिळाली. आता गेल्या तीन निवडणुकांचा कल पाहिला तर या मतदारसंघात सध्यातरी भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे.
लोकसभेचे मतदान
- शहर मध्य विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर लोकसभेला पक्षनिहाय पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. शहर दक्षिण मतदारसंघ सन २००४: भाजप: ४२,७३५, काँग्रेस: ४६,१४३, शहर मध्य मतदारसंघ सन २००९ भाजप: ४६,३८२, काँग्रेस: ५९,८३९. सन २०१४, भाजप: ७५,१८१, काँग्रेस: ५५,८१३. गेल्यावेळेसच शहर मध्यमध्ये भाजपच्या मतदानात वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पण हाच ट्रेंड विधानसभेला राहत नाही, असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे.