लातूर कारखान्यातून वर्षभरात डब्यांची निर्मिती करणार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी़ के़ शर्मा यांची माहिती, वाडी-सोलापूर मार्गावरील विकासकामांची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:28 PM2018-02-13T13:28:52+5:302018-02-13T13:37:30+5:30
लातूरमधील रेल्वे डबे निर्मितीचा प्रकल्प हा ५०० कोटींचा असू शकणार आहे़ कारखाना उभारणीच्या कामाला गती मिळाली असून, सध्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे़ लातूर एमआयडीसी अर्थात राज्य सरकार कारखान्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : लातूरमधील रेल्वे डबे निर्मितीचा प्रकल्प हा ५०० कोटींचा असू शकणार आहे़ कारखाना उभारणीच्या कामाला गती मिळाली असून, सध्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे़ लातूर एमआयडीसी अर्थात राज्य सरकार कारखान्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे़ येत्या १२ महिन्यांच्या आतच पहिला डबा तयार होऊन बाहेर पडेल अशा दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी़ के़ शर्मा यांनी दिली़
शर्मा यांनी सोमवारी वाडी-सोलापूर मार्गावर सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली़ सायंकाळी कोटणीस रुग्णालयात आयोजित केलेल्या वार्तालापात पत्रकारांशी संवाद साधत विभागात सुरु असलेल्या विकासकामांवर समाधान व्यक्त करत लातूर डबेनिर्मिती कारखान्यासह इतर विषयांवरील प्रगतीची माहिती दिली़ यावेळी सोलापूर विभागाचे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांची प्रमुख उपस्थिती होती़
प्रारंभी त्यांनी सोलापूर स्थानक येत्या तीन महिन्यांत एलईडीने झळकणार असल्याचे सांगत सौरउर्जेचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे, मोठ्या प्रमाणात वीज बचत होणार असल्याचे म्हणाले़ पूर्वी सुरक्षेसाठी विशेष निधी नव्हता, आता तो उपलब्ध होत असल्याचे म्हणाले़
यावेळी सरव्यवस्थापकांचेच मुंबईतील कार्यालय ऐतिहासिक वास्तूसंग्रहालय होण्याबाबत चर्चा असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता स्वत:चे कार्यालय सध्याच्या आहे त्याच इमारतीत राहणार असून सोबतचे इतर अधिकारी यांचे कार्यालयदेखील तेथेच राहतील म्हणाले़ मेक इंडिया अंतर्गत जपानकडून ८० टक्के रेल्वे इंजिन आणि डबे खरेदी केले जात असल्याच्या मुद्यावर स्पष्टीकरण देताना खूप कमी कालावधी असून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जपानकडून खरेदी होत असल्याचे सांगितले़
---------------------
खा़ बनसोडेंनी मांडले प्रवासी सुविधांचे प्रश्न
दिवसभरात खा़ शरद बनसोडे यांनी मुख्य व्यवस्थापक शर्मा यांची भेट घेऊन सोलापूर विभागातील सेवा-सुविधांचे प्रश्न उपस्थित केले़ हे प्रश्न लवकरात लवकर सुटतील, असा आशावाद सरव्यवस्थापकांनी व्यक्त केला़ याबरोबरच सोलापुरातील रेल्वे रुग्णालय, नियंत्रण कक्षाची पाहणी केली़ युनियनच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले़
--------------------------
दिवसभरातील घडामोडी़़़
- वाडी स्थानकावर क्रू लॉबी, रनिंग रुम, टीटीई रेस्ट हाऊस इमारतीची पाहणी़
- कॉगनी ब्रीज, गँग युनिट, टर्न आऊट आणि कर्वची पाहणी़
- ई-सॉकेट टेस्टिंग कन्फर्मेशन प्रणालीचे प्रात्यक्षिक
- मरतूर आणि गुलबर्गादरम्यान १२० कि़मी़ प्रती तासाच्या वेगाची चाचणी
- गाणगापूर रोड येथे अल्ट्रा सोनिक फ्लो डिटेक्टर, टोलोड मेजरिंग डिवाईस, डिजिटल डबल रेल टेस्टर, डिजिटल सिंगल रेल टेस्टर ट्रॅकच्या दुरुस्तीची पाहणी