वाळूअभावी अक्कलकोट तालुक्यात घरकुलांचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:03+5:302021-01-14T04:19:03+5:30
अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीतील गरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने ८६४ घरकूल मंजूर करुन दिले आहेत. यासाठी ...
अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीतील गरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने ८६४ घरकूल मंजूर करुन दिले आहेत. यासाठी २१ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर आहे. आतापर्यत काही जणांचे घरकूल पूर्ण होत आले आहे तर काही लाभार्थ्यांनी पूर्ण केले आहे. मात्र काही दिवसांपासून तालुक्यात बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. यामुळे अपूर्ण बांधकामाचे आकडे वरिष्ठांना फुगलेले दिसत आहेत.
अक्कलकोट नगरपालिका क्षेत्रातील गोरगरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकूल मिळावेत म्हणून एकट्या अक्कलकोट शहरात मागील दोन वर्षात ३९४ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या घरकुलासाठी शासनाकडून ११ कोटी ७५ लाखाचा निधी उपलब्ध आहे. तसेच रमाई घरकूल योजनेच्या माध्यमातून ४७० घरकुलांसाठी निधी मिळाला आहे. त्यासाठी ११ कोटी ७५ लाख रुपये निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. अक्कलकोट शहरासाठी मागील दोन वर्षात ८६४ घरकुले मंजूर आहेत. २१ कोटी ६० लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे. दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी अडीच लाखाचे अनुदान आहे. काही लाभार्थ्यांनी स्वत:चे घरकूल पूर्ण केले आहे. काही जणांनी नुकतीच सुरूवात केली आहे. कोणाचे बांधकाम हे जोथ्यापर्यंत तर कोणाचे लेंटल छतापर्यंत पूर्ण झालेले आहे. या सगळ्या घडामोडीत मागील सहा महिन्यांपासून तालुक्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. वाळू उपसा बंद केला आहे. यामुळे कुठेच वाळू मिळताना दिसत नाही. परिणामी अनेक घरकुलांचे बांधकाम रखडले आहे.
---
अक्कलकोट नगरपालिकेने माझ्या नावे घरकूल मंजूर केले आहे. पाया खोदून बांधकामाला सुरवातही केली आहे. परंतु बांधकामासाठी कुठेच वाळू मिळताना दिसत नाही. एखादा डंपर मिळाला तरी ते चढ्या दराने विक्री करीत आहेत. हे दर सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही.
- सरस्वती कोळी
खासबाग, अक्कलकोट
---
अक्कलकोट येथे प्रधानमंत्री व रमाई आवास अशा दोन योजनातून ८६४ घरकूल मंजूर झाले आहेत. त्यासाठी २१ कोटी ६० लाख निधी उपलब्ध आहे. लाभार्थ्यांचा वारंवार पाठपुरावा सुरू आहे. केवळ वाळूअभावी बांधकामे बांधून पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
- अविनाश शेंडगे
तांत्रिक कक्ष अधिकारी
--
शासनाने अक्कलकोटसाठी मुबलक घरकुले मंजूर केली असली तरी वाळू अभावी बांधकामे रखडली आहेत. अधिकारी, कर्मचारी हे घरकुलांच्या पूर्णत्वासाठी झटत आहेत. वाळूसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्याय काढावा.
- शोभा खेडगी
नगराध्यक्षा, अक्कलकोट
---
फोटो : १३ अक्कलकोट, १३ अक्कलकोट १
अक्कलकोट शहरातील खासबाग येथील घरकूल वाळूअभावी अपूर्ण राहिले आहे.