रुळाजवळ उभारणं पडलं महागात, रेल्वे चिकटून गेली; डोकं अन् कान शेकाटले
By विलास जळकोटकर | Published: March 21, 2023 06:24 PM2023-03-21T18:24:57+5:302023-03-21T18:25:34+5:30
करमाळा येथील प्रवासी सतीश अर्जुन शिंदे (वय ४५) हा सोमवारी सायंकाळी जेऊर रेल्वे स्टेशनवर रुळाला लगत थांबलेला होता
विलास जळकोटकर/ सोलापूर
सोलापूर : रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर थोडसं जरी दुर्लक्ष केलं की किती महागात पडू शकतं याचा अनुभव जेऊर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाला आला. सोमवारी सायंकाळी ७ वाजता तो स्टेशनवरील रुळाजवळ थांबला होता. वेगानं सोलापूरकडे येणारी रेल्वे त्याला चिकटून गेली ( धडक दिली). यात त्याच्या डोकं आणि कानास गंभीर दुखापत झाली.
करमाळा येथील प्रवासी सतीश अर्जुन शिंदे (वय ४५) हा सोमवारी सायंकाळी जेऊर रेल्वे स्टेशनवर रुळाला लगत थांबलेला होता. सायंकाळच्या सातच्या सुमारास नेमकी जेऊरहून सोलापूरकडे जाणारी रेल्वे आली आणि सतीश यांच्या डोक्यास व कानास चाटून गेली. यात त्यांना मुका मार लागला. लागलीच त्यांना करमाळ्यातील सरकारी दवाखानान्यात उपचार करवून सोलापूरला शासकीय रुग्णालयात हलवावे लागले.
खबरदारी घ्या अन्यथा...
रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर प्लॅटफार्मवर रेल्वेची प्रतीक्षा करताना रुळापासून काही अंतरावर थांबावे. दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकतं. स्वत:ची खबरदारी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनानं या घटनेच्या अनुषंगानं सर्वांना सूचना देताना केले.