वाळू अन् पाण्याअभावी सोलापूर जिल्ह्यातील बांधकामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 02:00 PM2019-03-15T14:00:35+5:302019-03-15T14:03:14+5:30
माळशिरस : वीट, वाळू, पाणी , सिमेंट याबरोबरच ठेकेदार, गवंडी, बिगारी, पेंटर, आर्किटेक्चर अशा अनेकांच्या साखळी कामामुळे इमारत उभारते. ...
माळशिरस : वीट, वाळू, पाणी, सिमेंट याबरोबरच ठेकेदार, गवंडी, बिगारी, पेंटर, आर्किटेक्चर अशा अनेकांच्या साखळी कामामुळे इमारत उभारते. या व्यवसायात मोठी उलाढाल होत असते़ हजारो मजुरांची रोजीरोटी यावर अवलंबून आहे, मात्र सध्या वाळू आणि पाण्याअभावी बांधकामे रखडल्याचे दिसून येतात़ इतकेच नाही तर दुष्काळात तेरावा म्हणून की काय बांधकाम साहित्याचे दरही वाढलेले आहेत़ त्यामुळे मजुरांना संसाराचा गाडा हाकणेसुद्धा कठीण झाल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास, रमाई आवास, इंदिरा आवास घरकूल योजनांमधील बांधकामे वेळेत पूर्ण करून घेणे अधिकाºयांना बंधनकारक असते़ प्रत्येक वर्षाचे ठराविक उद्दिष्ट असते़ परंतु यंदा या सर्व योजनांमधील बांधकामे रखडल्याचे दिसून येतात़ त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाळूची टंचाई आणि दुष्काळामुळे पाण्याचा अभाव होय़ तसेच सिमेंट व स्टीलचे दर वाढलेले दिसून येत आहेत़ त्यामुळे या सर्व गोष्टींचा व्यवसायावर ही परिणाम झाल्याचे दिसून येते़ अनेक बांधकामे अर्धवट स्थितीत आहेत तर अनेक कामांना मुहूर्त रखडलेला आहे. वाळूऐवजी (क्रश सॅन्ड) लहान खडी वापरली जात असली तरी हा व्यवसाय मंदीच्या सावटाखाली आहे.
या सर्व गोष्टीमुळे या बांधकामावर काम करणाºया मजुरांचे हाल होताना दिसतात़ कारण त्यांचा संसाराचा गाडा हाकणे कठीण होऊ लागले आहे.
बांधकामाचा वेग मंदावला
- तालुक्यात प्रतिवर्षी ५०० ते ५५० बांधकामे पक्की आरसीसी होतात तर साध्या पद्धतीची १५०० ते १६०० घरे तयार होतात़ पक्क्या बांधकामाला प्रती घराला ३ ते ४ लाख तर लहान घरांना ४० ते ५० हजार रुपये मजुरी खर्च येतो़ सध्या वाळू उपलब्ध नसल्याने क्रश कडी, वाळू ४ ते ५ हजार रुपये ब्रासप्रमाणे खरेदी करावी लागते़ सिमेंट व स्टीलमध्ये १५ टक्के वाढ झालेली आहे़ मजुरी व वीट यांचे दर मात्र स्थिर आहेत़ याशिवाय उन्हाची तीव्रता वाढल्याने बांधकामासाठी लागणारे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही़ अशा वेगवेगळ्या कारणाने सध्या बांधकाम व्यवसायाचा वेग मंदावल्याचे दिसून येते, असे काही ठेकेदार व मजुरांनी सांगितले़
उसाची बिले मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील काही बांधकामांना सुरुवात झाली होती, मात्र वाळूचा तुटवडा व इतर साहित्यांचे वाढलेले दर आणि मुख्यत्वे उपलब्ध नसलेले पाणी यामुळे अनेक कामे अर्धवट स्थितीत रखडलेली आहेत़ त्यामुळे या व्यवसायाशी निगडित असणाºया अनेक घटकांवर परिणाम होत आहे़
- रमेश तरंगे,
आर्किटेक्चर, तरंगफळ