गतिरोधक चुकवताना कंटेनरने दुचाकीला उडवले; पत्नी जागेवरच ठार, पती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:28 AM2021-09-17T04:28:09+5:302021-09-17T04:28:09+5:30
------ फोटो ............फोटो १६ कमल सोलापूर : भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने गतिरोधक चुकवण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक ...
------
फोटो ............फोटो १६ कमल
सोलापूर : भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने गतिरोधक चुकवण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यात दुचाकीवरून खाली पडलेल्या महिलेच्या पोटावरून चाक गेले तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे हा प्रकार कंदलगाव ते कोरवलीदरम्यान घडला.
नाना दादासाहेब म्हमाणे ( वय ७३) आणि त्यांच्या पत्नी कमल नाना म्हमाणे (वय ७१, दोघेही रा. नाथहोम, सैफुल ) दुचाकीवरून कंदलगाव तांड्यातून कोरवलीकडे निघाले होते. क्रॉसरोडजवळ समोरून आलेल्या कंटेनरने गतिरोधक चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोराची धडक दिली. कंटेनरचा वेग अधिक असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् दुचाकी खाली पडली. पाठीमागे बसलेल्या कमल म्हमाणे यांच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेले. दुचाकीचालक नाना माने यांच्याही पायावरून मागील चाक गेले. रोडलगत उभ्या असलेल्या काशिनाथ पांगळे (वय २३, रा.येळेगाव ) यांनी तातडीने दोघांनाही मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पत्नी कमल म्हमाणे मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर पती नाना म्हमाणे यांना उपचारासाठी सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात म्हमाणे यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त कंटेनर मध्यप्रदेशातील असून चालकाने न थांबता कंटेनर तसाच पुढे नेला. तेरामैलजवळ बंदोबस्तास असलेल्या मंद्रुपच्या पोलिसांनी त्याला अडवले. कंटेनर चालक सुरजितसिंह सुबेसिंह ( रा. रंजनपूर, जि. इंदोर) याला ताब्यात घेतले आहे. घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काशिनाथ पांगळे यांनी चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. एएसआय पवार अधिक तपास करीत आहेत.कमल म्हमाणे यांच्या मागे पती, मुलगा,सून,नातवंडे असा परिवार आहे.
फोटो ............फोटो १६ कमल