कंटेनर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:41+5:302021-01-18T04:20:41+5:30
वळसंगजवळ कंटेनरने दुचाकीला धडक दिली यात दोघांचा, तर कुंभारी येथे पाठीमागून दुचाकीला धडक मारल्याने झालेल्या अपघातात एकाचा अशा तिघांचा ...
वळसंगजवळ कंटेनरने दुचाकीला धडक दिली यात दोघांचा, तर कुंभारी येथे पाठीमागून दुचाकीला धडक मारल्याने झालेल्या अपघातात एकाचा अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे. यातील कंटेनरचालक वळसंगच्या अपघातानंतर जीव वाचवण्यासाठी सुसाट वेगाने सोलापूरच्या दिशेने येत होता. कुंभारीजवळ आल्यानंतर पाठलाग चुकवण्यासाठी चालकांने कुंभारीच्या वेशीत कंटेनर घातला. यादरम्यान त्याने दोन कार आणि दोन दुचाकींना धडक दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले. चालक पी. के. पांडे (रा. उत्तर प्रदेश) याला कुंभारीत जमावाकडून बेदम मारहाण करताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कंटेनर चालकाला वळसंग पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले. स्कॅनिंग मशीन बंद पडल्याने शनिवारी त्याच्यावर उपचार करता आले नव्हते. रविवारी उपचारानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वळसंग ठाण्याचे पोलीस शासकीय रुग्णालयात गेले आणि त्यांनी चालकाला अटक केली. अटकेनंतर रात्री उशिरा त्याची रवानगी अक्कलकोटला करण्यात आली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.
----