सततचा पाऊस खरिपास पोषक; डाळिंबाला नुकसानकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:25+5:302021-07-24T04:15:25+5:30
सांगोला तालुक्यात चालूवर्षी रोहिणी, मृग नक्षत्राचा प्रारंभी दमदार पाऊस पडला आणि शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले. शेतात जसा जसा ...
सांगोला तालुक्यात चालूवर्षी रोहिणी, मृग नक्षत्राचा प्रारंभी दमदार पाऊस पडला आणि शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले. शेतात जसा जसा वापसा येईल, तशी शेतकऱ्यांनी बाजरी, मका, तूर, सूर्यफूल, उडीद, भुईमूग आदी पिकांच्या पेरणीला सुरुवात केली. सुरुवातीला ४२१६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्यानंतर मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. पुन्हा पेरणीलायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली. सध्या शिवारच्या शिवार बाजरी, मका, तूर, भुईमूग, सूर्यफूल, उडीद आदी पिके बहरल्याने शेतात हिरवाई नटल्याचे दिसत आहे.
मक्यावर अमेरिकन अळीचा प्रादुर्भाव
शेतकरी बाजरी, मका, सूर्यफूल आदी पिकांना रासायनिक खतांचे डोस देत असल्यामुळे पिकांची जोमात उगवण झाली आहे. सतत पडणारा पाऊस खरीप पिकांना पोषक असला तरी प्रामुख्याने मक्यावर अमेरिकन अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मक्यावर फवारणी करून घेणे गरजेचे आहे. ढगाळ वातावरण व पावसाळा असल्यामुळे डाळिंबावर तेल्या, कुजवा रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बागांवर फवारणी केली तरच रोगावर नियंत्रण ठेवता येईल, असे कृषी विभागाकडून आवाहन केले आहे.
मक्याचे क्षेत्र वाढण्याचे संकेत
तालुक्यात ३१,५०४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या अपेक्षित असून २७ हजार ६३६ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. शुक्रवारी तालुक्यात ९ मंडलनिहाय सरासरी २५६ मि.मी. पाऊस झाला आहे. अद्यापही पाऊस चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. यंदा बाजरीनंतर मक्याचे क्षेत्रही वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
कोट ::::::::::::::::::::
सांगोला तालुक्यात शुक्रवारअखेर बाजरी १६ हजार ६०९ हेक्टर, मका ६ हजार ८४९ हेक्टर, सूर्यफूल १ हजार ९३० हेक्टर, तूर ८६४ हेक्टर, उडीद ५९३ हेक्टर, भुईमूग ३९९ हेक्टर, मूग ३१८ हेक्टर अशा एकूण २७,६३६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या झाल्या आहेत. अजूनही वापसा येईल तशा पेरण्या चालू असून मक्याचे क्षेत्र वाढणार आहे.
- रमेश भंडारे
प्रभारी तालुका कृषी अधिकारी