केबल, विद्युत पंप, वायडिंगची सतत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:10+5:302021-07-05T04:15:10+5:30
सोलापूर : विद्युत पंप चोरल्या, मोटारीतील तांब्याच्या तारा चोरीला गेल्या, एवढेच काय, केबलची तर सतत चोरी होते. एकदा ...
सोलापूर : विद्युत पंप चोरल्या, मोटारीतील तांब्याच्या तारा चोरीला गेल्या, एवढेच काय, केबलची तर सतत चोरी होते. एकदा पोलीस आले अन् लिहून घेऊन गेले. कधीच चोर हाती लागले नाहीत, त्यामुळे आता बीबीदारफळच्या शेतक-यांनी आता तक्रार देणेच बंद केले आहे.
बीबीदारफळ तलावात मागील दोन वर्षांपासून पाणी असल्याने शेतक-यांनी तलावाभोवताली मोटारी टाकून बागायत केले आहे. मात्र, तलावातील मोटारींना चोरट्यांचा सतत त्रास असतो. लांबवर असलेल्या केबल व मोटारीतील तांब्याच्या तारांची सतत चोरी होते. मोटारीही चोरीला जातात. मागील वर्षी एकाच रात्री १०-१२ शेतक-यांच्या केबल, मोटार व वायडिंगमधील तांब्याची तार चोरीला गेली. शेतक-यांनी पोलिसांना कळविले. पोलीस आले तलावात जाऊन पाहणी केली. शेतक-याकडून कोणाचे काय चोरीला गेले, त्याची माहिती लिहून घेतली व पोलीस निघून गेले. त्यानंतर, अनेक वेळा तलावातील मोटारी, केवल चोरीला गेले. चोर पोलिसांच्या हाती लागत नसल्याने शेतकरीही आता चोरीची तक्रार करीत नाहीत. मागील १० दिवसांत महादेव पिंपळे यांची मोटार, महादेव ननवरे व इतर चार शेतक-यांची केबल चोरीला गेली आहे.
----
या शेतक-यांची झाली चोरी
दत्तात्रय चौरे, प्रकाश चव्हाण, श्रीकांत जगदाळे, नानासाहेब चौरे, भास्कर चौरे, महादेव ननवरे, विशाल चौरे, दादा ताटे, पांडुरंग धर्मशाळे, ज्ञानेश्वर साठे, प्रवीण साठे, महादेव पिंपळे, दीपक पाटील, नाना सावंत आदीसह इतर शेतकऱ्यांच्या दोन व तीन वेळा केबल, मोटार व वायडिंगमधील तांब्याची तार चोरीला गेली आहे.
----
एकदा केबल व दुस-या वेळी विद्युत मोटारीची चोरी झाली. मागील दोन वर्षांत सततच शेतक-यांचे साहित्य चोरीला जाते. चोर सापडत नसल्याने, पुन्हा- पुन्हा पंपाचे साहित्य चोरीला जाते.
- महादेव ननवरे,
शेतकरी, बीबीदारफळ