विजेचा धक्क्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:53+5:302021-01-13T04:55:53+5:30
करमाळा : तालुक्यातील कंदर परिसरात दुरुस्तीकामासाठी विद्युत रोहित्राच्या खांबावर चढलेला एक कंत्राटी वीज कामगार विजेचा धक्का बसून मरण ...
करमाळा : तालुक्यातील कंदर परिसरात दुरुस्तीकामासाठी विद्युत रोहित्राच्या खांबावर चढलेला एक कंत्राटी वीज कामगार विजेचा धक्का बसून मरण पावला.
सचिन सदाशिव साळुंखे (वय ३२, रा. सातोली, ता. करमाळा) असे मरण पावलेल्या कंत्राटी वीज कामगाराचे नाव आहे. शनिवारी (दि. ९) दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी चुलत भाऊ अमरजित साळुंखे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, कंदर वीज उपकेंद्रातील यंत्रचालक संतोष मंडलिक आणि साहाय्यक अभियंता ओंकार परीट यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुरुस्तीच्या कामावर जाताना सचिन साळुंखे यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. त्याबाबत फोनवरून कळविल्यानंतर साळुंखे रोहित्राच्या खांबावर चढले. मात्र, विजेचे दुरुस्तीचे काम करीत असताना वीजप्रवाह सुरू असल्याने शॉक बसून तेथेच अडकून त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा साधनांचा अभाव आहे. सचिन साळुंखे विजेच्या कामासाठी जात असतानाही वीज प्रशासनातील जबाबदार अधिकारी वर्गाकडून सुरक्षिततेसाठी कोणतीही साधने पुरविली नाहीत, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. साळुंखे यांच्या कुटुंबाला तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर तेथील कारभारातील गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे. कंत्राटी कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जबाबदार व्यक्तींवर कारवाई व्हावी, तसेच मृताच्या कुटुंबास तत्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी अमरजित साळुंखे यांनी केली आहे.
....................................
फोटो : १० सचिन साळुंखे