करकंब येथे चोरटी वाळू वाहतूक रोखली; ट्रकसह सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त
By Appasaheb.patil | Published: March 25, 2023 05:29 PM2023-03-25T17:29:21+5:302023-03-25T17:30:37+5:30
पंढरपूर तालुक्यातील करकम येथे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली.
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील करकम येथे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली. वाळू चोरी करणाऱ्या ट्रकसह सव्वा पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप त्यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करीत असताना पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या टिमला बातमीदाराकडून बातमी मिळाली की, शिरढोण (ता. पंढरपूर) येथील भिमा नदीच्या पात्रातून काही इसम शासनाची परवानगी व राॅयल्टी नसताना वाळूचे उपसा करून चोरून वाळू वाहतूक व त्याची विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी पथकासह मौजे भोसे, (ता. पंढरपूर जि. सोलापूर) येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली असता, सदर ठिकाणी पहाटेच्या सुमारास मौजे भोसे पाटी जवळून पंढरपूर ते करकंब जाणा-या रस्त्यावरून एक हायवा ट्रक भरधाव वेगाने करकंबच्या दिशेने जाताना दिसला. त्याचा आम्हांस संशय आल्याने लागलीच त्याचा पाठलाग करून सदरचे वाहन पकडून चेक केले असता, सदर वाहनाच्या पाठीमागील हौदामध्ये एकूण ४ ब्रास वाळू मिळून आली. चालकाकडे सदरबाबत विचारपूस केली असता सदरची वाळू ही शिरढोण ता. पंढरपूर येथून भिमानदीच्या पात्रातून काढलेली वाळू विक्री करीता घेवून जात असलेबाबत सांगितले. सदर वाळूवाहतूकी बाबत त्याचेकडे परवानाबाबत विचारपूस केली असता त्याचेकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे हायवा ट्रकसह चालकास ताब्यात घेवून एकूण 15 लाख 28 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, बिराजी पारेकर, पोलीस अंमलदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे यांनी बजावली आहे.