यात्रेतील धूळ नियंत्रित करण्यासाठी दिवसातून २० टँकर पाण्याची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 02:10 PM2020-01-18T14:10:27+5:302020-01-18T14:12:24+5:30
सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील व्यापारी समाधानी : सिध्देश्वर देवस्थान पंच समितीकडून घेतली जातेय काळजी
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : लहानांपासून मोठ्यांचे आकर्षण असणारी गड्डा यात्रा सध्या होम मैदानावर भरली आहे. गड्डा यात्रेत धुळीचा त्रास होत असतो. यावर उपाय म्हणून मंदिर समिती होम मैदानावर दिवसातून दोनदा पाण्याचा फवारा करत आहे. यामुळे मैदान व परिसरातील होणाºया धुळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
नागरिकांना होम मैदान परिसरात नेहमी धुळीचा त्रास सहन करावा लागतो. अनेकजण या परिसरात होणाºया धुळीमुळे गड्डा यात्रेला जाण्याचे टाळतात. धुळीमुळे सर्दी, खोकला तसेच श्वसनासंदर्भातील आजाराला निमंत्रण मिळते. अस्थमा आजाराचा त्रास असणाºया नागरिकांना धुळीचा सर्वात जास्त त्रास होत असतो. नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी त्यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. मंदिर समितीतर्फे नागरिक व व्यापाºयांना त्रास होऊ नये यासाठी टँकरद्वारे होम मैदानावर पाणी फवारण्यात येत आहे. दिवसातून दोनदा रोज आठ ते दहा असे दिवसातून १६ ते २० टँकरमधील पाणी होम मैदान व परिसरात फवारले जात आहे. सकाळी व दुुपारी असे दोनदा पाणी फवारल्यामुळे धुळीवर बºयाचअंशी नियंत्रण मिळविता आले आहे.
महापालिकेतर्फे स्वच्छतागृहाची व्यवस्था
- मंदिर समितीतर्फे होम मैदानावर पाणी फवारण्यात येत आहे. यामुळे माती कमी प्रमाणात उडत असून आम्हाला धुळीचा खूप कमी त्रास होत आहे. मंदिर समितीतर्फे नागरिक व व्यापाºयांसाठी काळजी घेण्यात येत असल्याची प्रतिक्रिया एका व्यापाºयाने दिली. गड्डा यात्रा परिसरात महापालिकेतर्फे स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मैदानावर लाल रंगाच्या मातीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांहून होमकट्ट्याकडे येण्यासाठी चार रस्ते हे लाल रंगाची माती टाकून तयार करण्यात आले आहे. यामुळे तसेच विविध प्रकारच्या रोषणाईने होम मैदानाला आकर्षक रुप आले आहे.
यंदाच्या यात्रेमध्ये लेसर शोचा वापर करण्यात आला. यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळविता आले. तसेच मैदानावर पाणी फवारल्यामुळे धुळीचा त्रास कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. यामुळे गड्डा यात्रेतील व्यापारी व नागरिक समाधानी आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत
- भीमाशंकर पटणे
अध्यक्ष, यात्रा समिती