नियंत्रण कक्षात रोज पाचशे कॉल येतात; काही फेक तर काही छळाच्या असतात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 05:12 PM2021-08-11T17:12:22+5:302021-08-11T17:12:29+5:30
सर्वाधिक फोन महिलांचे : मदतीसाठी पोलीस धावतात, तिथं काहीच नसतं
संताजी शिंदे
सोलापूर : सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने पोलीस आयुक्तालय किंवा ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात असलेल्या या नियंत्रण कक्षात दररोज ४५० ते ५०० कॉल येतात. मात्र, यामध्ये बहुतांश कॉल फेक असतात, पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर काही मिळत नाही. जास्त करून महिला छळाच्या बाबतीत फोन येतात.
शहर पोलीस आयुक्तालयात नागरिकांना तत्काळ मदत मिळावी म्हणून डायल १०० नंबर, ०२१७ २७४६००, ०२१७ २७४६२० क्रमांक देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयात २४ तास दोन पोलीस उपनिरीक्षक, चार सहायक फौजदार, चार पोलीस नाईक व चार पोलीस कॉन्स्टेबल यांची ड्युटी लावण्यात आली आहे. सात पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोणाला जर मदत हवी असेल तर नागरिक हेल्पलाईन नंबर डायल करतात. मदतीसाठी फोन आला की तत्काळ त्याची दखल घेतली जाते. नाव, पत्ता घेऊन त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली जाते. पोलीस ठाण्याकडून तत्काळ गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना निरोप दिला जातो. कर्मचारी घटनास्थळी जाऊन परस्थिती पाहतात. भांडणे सुरू असतील तर पोलीस ठाण्याची गाडी बोलावून घेतात. घरगुती भांडण असेल तर समजावून सांगतात अन्यथा पोलीस ठाण्यात येण्यास सांगतात.
शहरातून दररोजी अनेक कॉल येतात त्याची तत्काळ दखल घेतली जाते. पेट्रोलिंगवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कॉल देऊन घटनास्थळी पाठविले जाते. ग्रामीण भागातून व जिल्ह्या बाहेरूनही नियंत्रण कक्षाला कॉल येतात. आम्ही येणाऱ्या प्रत्येक कॉलचे समाधान करतो. अडचणीत असलेल्या व्यक्तीला मार्गदर्शन करतो. दररोज फेक कॉलही येतात त्याचा आम्हाला नाईलाज असतो. शक्यतो अडचणीत असलेल्या किंवा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य माहिती देण्यासाठीच लोकांनी नियंत्रण कक्षाला कॉल करावा.
श्रीकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक, नियंत्रण कक्ष.
सर्वाधिक कॉल महिलांचे
० दररोज येणाऱ्या कॉलमध्ये महिलांच्या तक्रारीचे प्रमाण जास्त आहे. पती मारहाण करत आहे, शेजारचे लोक भांडण करत आहेत. छेडछाड केली जात आहे. कोणी तरी पाठलाग करत आहे. कामाच्या ठिकाणी त्रास दिला जात आहे अशा एक ना अनेक तक्रारी महिलांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितल्या जातात. अशावेळी संबंधित पोलीस स्टेशनचे कर्मचारी किंवा दामिनी पथकाला महिलांच्या मदतीसाठी पाठविले जाते.
दररोज किमान २० फेक कॉल
- ० रात्री-अपरात्री कोणीतरी फोन करत अमूक या ठिकाणी हाणामारी होत आहे तेव्हा पोलीस घटनास्थळी जातात मात्र तेथे काही नसत. मग फोन कोण केला त्याचा शोध घेतला जातो.
- ० पती पत्नीचे भांडणे होतात. पत्नी १०० नंबरला फोन करते. पोलीस कॉल करणाऱ्या महिलेच्या घरी जातात तेव्हा दोघांची भांडणे मिटलेली असतात. पोलिसांना याचा नाहक त्रास होतो.
- ० अशा प्रकारे दररोज किमान १८ ते २० फेक कॉल येतात. फेक कॉल करून त्रास देणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जातात. कॉल कोठून आला याची तत्काळ माहिती नियंत्रण कक्षाला समजते.
कंट्रोल रूमला आलेले कॉल
- जून १००५०
- जुलै १०७४०
- ऑगस्ट ४०५०