फेसबुकवरील वादग्रस्त छायाचित्राचे जिल्ह्यात पडसाद

By admin | Published: June 1, 2014 12:41 AM2014-06-01T00:41:34+5:302014-06-01T00:41:34+5:30

पोलिसांचा बंदोबस्त: पंढरपूर, कुर्डूवाडीत दगडफेक

A controversial picture of the picture on Facebook is in the district | फेसबुकवरील वादग्रस्त छायाचित्राचे जिल्ह्यात पडसाद

फेसबुकवरील वादग्रस्त छायाचित्राचे जिल्ह्यात पडसाद

Next

सोलापूर: फेसबुकवर धर्मवीर श्री संभाजी महाराज या नावाच्या बनावट खात्यावर शिवाजी महाराजांची बदनामीकारक छायाचित्रे प्रसिद्ध झाल्याने पंढरपूर, माढा, मंगळवेढा, करमाळा, सोलापुरात शनिवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त जमावाकडून पंढरपूर येथे दुकान तर कुर्डूवाडीत सहा बसवर दगडफेक करण्यात आली. यात ७ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. पंढरपुरापासून या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन या प्रकाराचा निषेध करून दुकाने बंद करण्याचे आवाहन करु लागले. काही कार्यकर्त्यांनी जुना कराड नाका, नवीन बसस्थानक, गजानन महाराज मठासमोर, महाद्वार परिसर, नाथ चौक आदी परिसरातील दुकानांवर दगडफेक केली. यामुळे काहीच क्षणात पंढरपुरातील सर्व दुकाने बंद झाली. पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणताही मोठा अनूचित प्रकार घडला नाही. यानंतर विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली. पो.नि. अशोक कोळी यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर शांतता कमिटीची बैठक झाली. माढा शहरात शनिवारी दुपारनंतर ही वार्ता पसरली. शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले. माढा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. फेसबुकवरील तो बदनामीकारक मजकूर काढून टाकावा,असे निवेदन छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने नितीन साठे व प्रवीण चवरे यांनी पोलिसांना दिले. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध सामाजिक संघटना रविवारी सकाळी दहा वाजता माढा शहरातील शिवाजी चौकात एकत्र जमा होणार आहेत. कुर्डूवाडीत रात्रीच्या सुमाराला संतप्त जमावाने राज्य परिवहनच्या सहा बसवर दगडफेक केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप भोरे व माढा तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष बाळासाहेब बागल, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन बागल, शिवसेना भोसरे शाखाध्यक्ष दत्तात्रय बागल, अमोल बागल यांनी कुुर्डूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दगडफेकीच्या या प्रकारामुळे कुर्डूवाडी बसस्थानकावर पोलीस बंदोबस्तामध्ये बस लावण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय उडाली. मंगळवेढा शहरात ही वार्ता पसरताच संतापाची लाट उसळली. शिवप्रेमी एकत्र आले व त्यांनी पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर ठिय्या मांडला. पोलीस ठाण्यात कोणीच नसल्याचे पाहून जमाव संतप्त झाला. माहिती मिळताच उपअधीक्षक किशोर कारंडे व पो. नि. दिलीप पाटील तेथे आले. त्यांनी परमेश्वर हरी पाटील (रा.खंडोबा गल्ली) यांची फिर्याद नोंदवून ज्ञात समाजकंटकाविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान अ‍ॅक्ट सन २००० चे कलम ६६ अ नुसार गुन्हा दाखल केला. सोलापुरात रात्री साडेदहा वाजता जेलरोड पोलीस ठाण्यात जमाव जमला व त्यांनी निवेदन दिले.

--------------------------

पंढरपुरात शांतता कमिटीची बैठक

पंढरपुरात दगडफेकीच्या घटनेनंतर उपअधीक्षक प्रशांत कदम, पो.नि. अशोक कोळी यांनी तत्काळ शांतता कमिटीची बैठक घेतली. बैठकीला प्रांत अधिकारी संजय तेली, तहसीलदार गजानन गुरव उपस्थित होते. बदनामीकारक मजकुराबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------------

शिवप्रेमींच्या तक्रारीनंतर सायबरसेलकडून सोशल नेटवर्क सेंटरला वादग्रस्त छायाचित्रे काढून टाकण्याबाबत मेल करण्यात आला आहे. २४ तासात फेसबुकवरील ते खाते बंद केले जाईल. वादग्रस्त छायाचित्रे अपलोड करणार्‍याचा राज्यपातळीवर शोध घेतला जात आहे. नागरिकांनी शांत रहावे. - पो. नि. नितीन कौसडीकर, स्थानिक गुन्हे शाखा

Web Title: A controversial picture of the picture on Facebook is in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.