मुदतीत पदवी न मिळविलेल्या सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर गंडांतर
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 31, 2023 12:22 PM2023-01-31T12:22:39+5:302023-01-31T12:23:01+5:30
यूजीसी नियमानुसार नॅचरल पिरियड तसेच त्यासोबत अतिरिक्त दोन वर्षात पदवी व पदविका न मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेला बसता येणार नाही.
सोलापूर :
यूजीसी नियमानुसार नॅचरल पिरियड तसेच त्यासोबत अतिरिक्त दोन वर्षात पदवी व पदविका न मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेला बसता येणार नाही. असे एकूण ३२ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेला बसता येणार नसल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे. विद्यापीठाकडे अर्ज करून परीक्षेला बसण्याची विनंती विद्यार्थी करत आहेत. यूजीसी नियमानुसार त्यांना परीक्षेला बसता येणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
२०१५ साली यूजीसीने सोलापूर विद्यापीठाला एक पत्र पाठवले असून पत्रानुसार पदवीच्या विद्यार्थ्यांना एकूण पाच वर्षात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. नॅचरल पिरियड तसेच अतिरिक्त दोन वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्याची सूचना विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठवून केली. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना तशी सूचना देणे आवश्यक हाेते. २०१६ मध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीच्या विद्यार्थ्यांनी २०२१ मध्ये पदवी पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांना यंदा परीक्षांना बसता येणार आहे. सोलापूर विद्यापीठात असे एकूण ३२ विद्यार्थी असल्याची माहिती आहे. २०१६ पूर्वी तसेच त्यानंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नॅचरल पिरियडमध्ये पदवी मिळवणे बंधनकारक आहे. तसे न केलेल्या विद्यार्थ्यांना परत प्रवेश घेऊन प्रथम वर्षापासून परीक्षा द्याव्या लागतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.