काँग्रेस तालुकाध्यक्ष निवडीवरुन सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते-पाटील गटात पुन्हा वाद
By राकेश कदम | Published: April 19, 2023 11:01 AM2023-04-19T11:01:23+5:302023-04-19T11:04:23+5:30
चार तालुक्यातील नेत्यांनी घेतली प्रदेश सहनिरीक्षकांची भेट
राकेश कदम, सोलापूर: काँग्रेसच्या नव्या तालुकाध्यक्षांच्या निवडी स्थगित कराव्यात या मागणीसाठी माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी तालुक्यातील माजी तालुकाध्यक्षांनी मंगळवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेश सहनिरीक्षक सोनल पटेल यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर तालुकाध्यक्ष निवडीवरील स्थगिती कायम असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांनी केला. काही लोक शिंदे आणि मोहिते-पाटील यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा डाव हाणून पाडू, अशी प्रतिक्रिया मोहिते-पाटील गटाकडून बुधवारी आली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डिसेंबर २०२२ मध्ये जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या होत्या. या निवडीवरुन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील गटात वाद सुरू झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेश सहनिरीक्षक सोनल पटेल यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सोलापूर ग्रामीण काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीचा विषय निघाला. सोनल पटेल यांनी तालुकाध्यक्षांच्या निवडीला कोणत्याही प्रकारची स्थगिती नाही. काम सुरू करा, असे आदेश दिल्याचे मोहिते-पाटील यांचे म्हणणे होते. पटेल यांच्या स्पष्टीकरणानंतर ग्रामीण भागात काँग्रेसची आंदोलने सुरू झाली.
दरम्यान, माढ्याचे साैदागर जाधव, मोहोळचे सुरेश शिवपुजे, सांगोल्याचे सुनील गोरे, राजकुमार पवार, बार्शीचे जीवनदत्त आरगडे, तानाजी जगदाळे यांनी मंगळवारी मुंबईचे काँग्रेस भवन गाठले. काँग्रेस तालुकाध्यक्ष निवडीत काही दोष आहेत. या निवडींना सुशीलकुमार शिंदे यांची हरकत आहे, असे प्रदेश सहनिरीक्षक सोनल पटेल आणि प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांना सांगण्यात आले. सोनल पटेल यांनी या निवडींवर अजूनही स्थगिती असल्याचे पत्र दाखविल्याचे सौदागर जाधव म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे, धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या काँग्रेसचे जिल्ह्यात जन सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. तालुकाध्यक्ष निवडीला कोणत्याही प्रकारची स्थगिती नाही. सुशीलकुमार शिंदे आणि आमचे मंगळवारी बोलणे झाले. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील लवकरच सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत. जिल्ह्यातील तीन-चार लोक दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयत्न हाणून पाडू. आमचा पक्ष एकजुटीने काम करेल. -विजय हत्तरे, प्रमुख, देखरेख समिती, जिल्हा काॅंग्रेस.
काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निवड स्थगित असल्याचे सोनल पटेल यांनीच आम्हाला सांगितले आहे. मूळातच ही प्रक्रिया बेकायदेशीरपणे झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मे महिन्यात सोलापुरात येणार आहेत. यावेळी या निवडीवर चर्चा होणार आहे. -सौदागर जाधव, माजी तालुकाध्यक्ष, माढा.