सोलापूर प्रशिक्षण केंद्रात राज्यातील ६२९ महिला पोलीसांचे दीक्षांत संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:37 PM2017-08-09T14:37:29+5:302017-08-09T14:37:43+5:30
सोलापूर दि ९ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठ शेजारी केगांव हद्दीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६२९ महिला पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले़ या महिलांचा दीक्षांत समारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठ शेजारी केगांव हद्दीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६२९ महिला पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले़ या महिलांचा दीक्षांत समारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला़ यावेळी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या कविता नेरकर-पवार यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली़ त्यानंतर परेड व प्रशिक्षणार्थी पोलीसांनी शानदान संचलन केले़ यावेळी परेड कमांडर म्हणून पूनम गुंड, छाया उडतेवार, अंकिता मोहोळ, रेखा आगलावे, ज्योती फरकटे, अक्षता माळी व कविता साळुंखे यांनी आपले प्लाटून मार्च केले़ यावेळी सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक १० यांचे बॅन्ड पथक कार्यरत होते़
-----------
अक्षमा माळी सर्वोत्कृष्ट
या प्रशिक्षणात मुंबई रेल्वेची प्रशिक्षणार्थी अक्षता रमण माळी ही सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरली़ याशिवाय पूनम शिवाजी गुंड (व्दितीय - पुणे ग्रामीण), सुप्रिया बाळासाहेब भोईटे (तृतीय - मुंबई शहर), गोळीबार प्रकारात पूनम शिवाजी गुंड ही प्रथम तर चांदणी देवीदास कोंढे व अंबिका विलास जाधव या दोघींनी व्दितीय क्रमांक पटकाविला़
या कार्यक्रमावेळी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या कविता नेरकर-पवार यांनी अहवाल वाचन केले़ त्यानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींना शपथ दिली़ दीक्षांत संचलनानंतर प्रशिक्षणार्थी पोलीसांनी लेझीम, अदिवासी नृत्य व कमांन्डो सायलेन्ट ड्रिल असे विविध कार्यक्रम सादर केले़ या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी, मान्यवर, प्रशिक्षणार्थींचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते़
--------------
पोलीस शिपाई हा महत्वाचा कणा : तांबडे
पोलीस शिपाई हा पोलीस खात्याचा महत्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले़ पुढे बोलताना तांबडे म्हणाले की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने पोलीस खात्यावर आहे़ वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे, दहशतवाद यासारख्या गुन्ह्याचे आवाहन आता पोलीस दलासमोर असल्याचेही नमुद केले़