शिक्षकांना सुरक्षा कवच देण्याची समन्वय समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:16 AM2021-06-03T04:16:37+5:302021-06-03T04:16:37+5:30
अक्कलकोट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर रोज ताण येत आहे. या काळात शासकीय यंत्रणेस अधिक सक्षम करण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील ...
अक्कलकोट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर रोज ताण येत आहे. या काळात शासकीय यंत्रणेस अधिक सक्षम करण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने पुढाकार घेत कोविड सेंटरला आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरविण्याचा निर्धार केला आहे. याबरोबरच शिक्षकांना कोरोना काळात सुरक्षा कवच देण्याची मागणी तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडे शिक्षक संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे.
कोरोना काळात अनेक शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित झाले आहेत. काहींचा मृत्यूही झाला आहे. त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनानेही काळजी घ्यावी व त्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनेने केली. कोरोनाचे आदेश सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बजावण्यात यावेत. आदेश देताना रोटेशन पद्धत वापरावी आणि आदेशात नियुक्ती किती दिवसांसाठी करण्यात आली याचा उल्लेख करावा. शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांचे प्राधान्याने लसीकरण करा, एका शिक्षकास एकच काम द्या, दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त, गरोदर माता, स्तनदा माता आणि ५० वर्षेवरील कर्मचाऱ्यांना याकामी सूट द्या, कोरोनाबाधित राखीव बेडची व्यवस्था करा. मयत कर्मचाऱ्यांचे विमा कवच आणि शासकीय लाभ तातडीने मंजूर करावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी समन्वय समितीचे सिद्धाराम बिराजदार, विजय तडकलकर, योगेश बारसकर, तोरप्पा चव्हाण, परमेश्वर किणगे, बसवराज गुरव, राजश्री उप्पीन, अंबण्णा तेलुणगी, सिद्धाराम पुजारी, अविनाश मोरे, बालाजी हादवे, राजेंद्र मोहोळकर, ज्ञानेश्वर केंद्रे, दयानंद चव्हाण उपस्थित होते.
---
फोटो : ०२ अक्कलकोट
शिक्षकांना सुरक्षा कवच देण्याची मागणी तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडे निवेदनाद्वारे करताना समन्वय समितीचे पदाधिकारी.