आषाढी यात्रेच्या नियोजनात समन्वय ठेवावा
By admin | Published: June 18, 2014 12:53 AM2014-06-18T00:53:55+5:302014-06-18T00:53:55+5:30
दिलीप सोपल: स्थानिक नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा
पंढरपूर : आषाढी यात्रेत सर्व अधिकाऱ्यांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवावा, यात्रेत शासकीय यंत्रणेचे प्रतिबिंंब दिसावे त्या दृष्टीने संबंधित विभागांनी आतापासूनच नियोजन करावे, यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री दिलीप सोपल यांनी व्यक्त केली.
पंढरपूरच्या संत तुकाराम भवनात मंगळवारी झालेल्या आषाढी तयारी बैठकीत ते बोलत होते. मानाच्या सात पालख्यांबरोबरच इतर पालख्यांसोबत येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात यावे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या टी. सी. एल. पावडरची गुणवत्ता तपासली जावी, असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. यंदा आषाढीसाठी पाच जिल्ह्यातून साडेतीनशे अतिरिक्त कर्मचारी, १ हजारापेक्षा जास्त शौचालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मंदिर समितीने ५०० फॅब्रिकेट शौचालये द्यावीत असे सांगून, जलसंपदा विभागाने यात्रेदरम्यान नदीत पाणी सोडण्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्याची सूचना पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिल्या.
भारत विकास ग्रुपतर्फे आळंदी ते पंढरपूर या मार्गावर भाविकांसाठी ३४ रूग्णवाहिका कार्यरत ठेवणार असल्याचे उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंकज गायकवाड यांनी सांगितले. यात्रा कालावधीत दररोज शंभर टन कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी गोरे यांनी सांगितले तर सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी सांगितले. यावेळी वारकरी, फडकरी संघटनेचे ज्ञानेश्वर आप्पा जळगावकर यांनी आषाढी यात्रेत प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांची मागणी केली. यावेळी पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव, आ. बबनराव शिंदे, आ. हनुमंतराव डोळस, आ. दीपक साळुंखे, मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जि.प.उपाध्यक्ष सुभाष गुळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, प्रांताधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, जि.प. समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संजीवकुमार पाटील, तहसीलदार गजानन गुरव, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी ईशाधिन शेळकंदे, राज्य परिवहन महामंडळाचे श्रीनिवास जोशी, मंदिर समितीचे सदस्य वसंतराव पाटील, प्रा.जयंत भंडारे उपस्थित होते.
----------------------------
चार अतिरिक्त मुख्याधिकारी
जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी आषाढी यात्रा निर्विघ्नरित्या पार पडावी यासाठी पंढरपूर नगरपरिषदेला चार अतिरिक्त मुख्याधिकारी देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार टँकर घेण्यात यावेत, सर्व विभागांच्या तक्रारींसंदर्भात प्रांत कार्यालय येथे एकत्रित नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे.
-------------------------
लाखावर आॅनलाईन दर्शनाची शक्यता
यंदा १ लाख भाविक आॅनलाईन बुकिंग करतील असा अंदाज व्यक्त करुन, आषाढी यात्रेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले. २१८ धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून, आषाढी यात्रेदरम्यान होणाऱ्या कचऱ्याच्या सफाईबाबत नगरपरिषदेला अतिरिक्त कर्मचारी मिळावेत, अशी मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केली.
--------------------------------
ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ विस्तार अधिकारी
पालखी तळ व पालखी मार्गावरील सर्व झाडेझुडपे काढण्यात यावीत, जि.प.ने पालखी तळाचे मजबुतीकरण करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी पालखी तळ, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी पालखी मार्गावरील प्रत्येक ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ एक विस्तार अधिकारी देण्यात आल्याचे सांगितले.