शेगावसारखे प्रति ‘आनंद सागर’ पंढरपूरमध्ये व्हायला हवे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:26+5:302021-06-30T04:15:26+5:30
पंढरपूर : तीर्थक्षेत्र शेगावमधील ‘आनंद सागर’प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूरमध्ये व्हायला हवे, हे उद्यान उभे करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा, ...
पंढरपूर : तीर्थक्षेत्र शेगावमधील ‘आनंद सागर’प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूरमध्ये व्हायला हवे, हे उद्यान उभे करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.
पंढरपूर शहरातील विकासकामे व विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी डॉ गोऱ्हे यांनी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सहभाग घेतला.
भारतीय पुरातत्त्व विभागाकडे प्रलंबित असलेल्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जोशी यांनी मंदिराशी निगडित विठ्ठल मूर्तीचे संवर्धन, रखडलेला स्कायवॉक, परिवार देवता आणि मंदिरातील डागडुजी याविषयी झालेल्या कामांची माहिती यावेळी दिली. लॉकडाऊनपूर्वी घेतलेल्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या विशेष बैठकीमुळे लॉकडाऊन काळात मंदिर समितीला मंदिरातील अनेक कामे करता आली याबद्दल जोशी यांनी गोऱ्हे यांचे आभार मानले.
मंदिराच्या रखडलेल्या कामांना गती मिळाल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त करीत उर्वरित कामाबाबत लवकरच पुरातत्त्व विभागाची बैठक बोलावणार असल्याचे सांगितले.
पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी माळी यांनी चंद्रभागा नदीत जाणारे ड्रेनेजचे पाणी बंद केले असल्याचे स्पष्ट केले. प्रदक्षिणा मार्गाचे काँक्रिटीकरण करणे, नामसंकीर्तन कामासाठी निधीची उपलब्धता, प्रदक्षिणा मार्ग आदी विषय उपस्थित केले.
यावर डॉ. गोऱ्हे यांनी यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. पत्रकार सुनील उंबरे यांनी प्रदक्षिणा मार्गाचे काँक्रिटीकरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न, दर्शन रांगेचा अर्धवट स्कायवॉक, सार्वजनिक शौचालय, चंद्रभागा नदीतीरावरील घाट, शहरातील रस्ते आदी कामांकडे डॉ. गोऱ्हे यांचे लक्ष वेधले.
वरील सर्व मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा झाल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पंढरपूर दौरा करणार असल्याचे सांगितले.
----
वाखरी - सरगम चौक - अर्बन बँक उड्डाणपूल करा
प्रांताधिकारी ढोले यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांचा मुद्दा उपस्थित केला. देहू-आळंदी ते वाखरी या पालखी मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. तथापि, वाखरी-पंढरपूर या मार्गाबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. हे काम तातडीने होणे गरजेचे आहे. वाखरी ते सरगम चौक आणि सरगम चौक ते अर्बन बँक उड्डाणपूल केल्यास वारी काळात वाहतुकीची कोंडी होणार नाही. या कामाबाबत केंद्रीय परिवहनमंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून कामाला मंजुरी व निधीची उपलब्धता व्हावी, अशी मागणी ढोले यांनी केली.