सोलापूरच्या जवानाचा मृत्यू कोरोनामुळे; कुटुंबीयांना व्हिडीओ कॉलवरच घ्यावं लागणार अंत्यदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:45 AM2020-07-27T11:45:24+5:302020-07-27T15:22:25+5:30
पार्थिवाचे व्हिडिओ व्हिडीओ कॉलद्वारे दर्शन घडविणार; अंत्यदर्शनही होऊ न शकल्याने कुटुंबीयांचा आक्रोश
मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती गावचे जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचा निरोप सुरुवातीला लष्कराकडून मिळाला. संपूर्ण गाव मृतदेहाची वाट पाहू लागला; मात्र नागप्पाचा मृत्यू कोरोनाने झाला असून अंत्यसंस्कार श्रीनगरलाच होणार असल्याचे शेवटच्या क्षणी सांगण्यात आले.
३४ वर्षीय नागप्पा हे शेतकरी कुटुंबातील असून ते आठ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात सेवेत रुजू झाले होते. सध्या श्रीनगरमध्ये ते कर्तव्य बजावत होते. मार्च महिन्यात ते हुलजंती गावी सुट्टीसाठी आले होते. लॉकडाऊनमुळे ते साडेतीन महिने गावीच होते. सध्या सीमेवर वाढता तणाव असल्याने सर्व सैनिकांना बोलावणे आले होते, तसेच श्रीनगरकडे जाण्यासाठी पासही मिळाल्याने ते २४ जून रोजी रेल्वेने दिल्लीला गेले. तेथून त्यांना १५ दिवस क्वारंटाईन करण्यात आले.
११ जुलैला श्रीनगर येथे पोहोचल्यानंतर १८ जुलै रोजी बाहेरून आलेल्या जवानांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. २६ जुलैला ते ड्यूटीवर हजर होणार होते, तत्पूर्वी शनिवारी रात्री आठ वाजता छातीत दुखू लागल्याने त्यांना तेथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते; मात्र याठिकाणी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
पोस्टमार्टेम करण्यापूर्वी स्वॅब घेऊन कोरोना चाचणी घेतली असता पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यानंतर लष्कर अधिकाºयांनी कुटुंबीयांना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पार्थिव तिकडे पाठवता येत नाही, तरी येथेच अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी द्या असे सांगितले; मात्र कुटुंबीयांनी परवानगीसाठी नकार दिला. याबाबत मंगळवेढा येथील पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी कुटुंबीयांना भेटून त्यांची समजूत काढली.
आई व पत्नीचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
नागप्पा यांचे २००४ साली लग्न झाले. वैष्णवी व माही या दोन मुली असून माही ही फक्त चार महिन्यांची आहे तर वैष्णवी ही सहा वर्षांची आहे वडिलांचे निधन झाले आहे. दोघे भाऊ असून एकजण शेती करतो तर एकजण होमगार्ड आहे. आईही शेती कामात मुलांना मदत करते. तीन विवाहित बहिणी असून एकजण सोलापूर शहर पोलीस दलात सेवेत आहे. वडील वारल्यानंतर नागप्पा हा तसा कुटुंबकर्ता होता. देशाची रक्षा करणाºया कोरोना योद्ध्याचा मृत्यू कोरोनाने झाल्याने त्याच्या दोन चिमुकल्याचे पितृछत्र हरपले आहे. या वीर जवानाचे अख्खे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. त्याच्या आई,पत्नीचे व आठ वर्षीय चिमुकलींचे अश्रू थांबता थांबत नाहीत. केवळ चार महिने वय असलेल्या माही या मुलीला अजून जग कळायच्या अगोदरच तिचे पिता जग सोडून गेल्याचे दु:ख कुटुंबीयांसह अख्ख्या गावाला झाले आहे.
कुटुंबीयांना नेहमी असायची चिंता
भारत-पाकिस्तान सीमेवरील काश्मीर खोºयात नेहमी तणावाची स्थिती असते. म्हेत्रे हे गेल्या आठ वर्षांपासून श्रीनगर येथे सेवेत होते.ते ११३९ रेजिमेंटमध्ये कार्यरत होते तसेच ते अतिदुर्गम भागात कार्यरत असल्याने अनेकवेळा मोबाईलवरूनही संपर्क होत नव्हता.काही महिन्यांपासून तणावाची स्थिती वाढली होती.
पार्थिवाचे व्हिडिओ व्हिडीओ कॉलद्वारे दर्शन घडविणार
जवान नागप्पा याचे निधन कोरोनाने झाले याबाबत कुटुंबीय मान्य करायला तयार नव्हते. यावर तहसीलदार स्वप्निल रावडे व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी श्रीनगर येथील लष्कर अधिकारी यांना फोन जोडून दिला असता संबंधित अधिकाºयाने सविस्तर माहिती दिली. तब्बल तीन तास कुटुंबियांच्या सुरू असलेल्या चर्चेत अखेर तोडगा काढण्यात आला. जवान नागप्पा यांचे मुखदर्शन व्हिडीओ कॉल द्वारे करून मगच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तसेच त्यांची सर्व कार्यवाही झाल्यानंतर अस्थी कुटुंबियांना देण्यात येतील असे लष्कर अधिकाºयांनी सांगितले असल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली