‘कोरोना’तही नातं अतूट; बहिणींच्या राख्या ‘ऑनलाइन ’द्वारे भावांच्या मनगटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:46 PM2020-07-29T12:46:45+5:302020-07-29T12:49:23+5:30
एका क्लिकवर मिळते राखी; पोस्टाला मिळतोय अल्प प्रतिसाद
सोलापूर : दूरवर राहणाºया बहिणीनं पाठवलेली राखी... ती हातात बांधताना तिच्या आपुलकीचे स्मरण होते. कोरोनाचे संकट असतानाही अशा बहिणी ऑनलाइन चा पर्याय निवडत राख्या पाठवत आहेत. ती दूरवर असलेल्या सासरी राहत असली तरी कोरोनाच्या संकटातही नातं टिकवून आहे. पोस्टाच्या माध्यमातून राख्या पाठवण्यास अल्प प्रतिसाद पाहावयास मिळत आहे.
गेल्या वर्षी शहरातून पोस्टामार्फत एक लाख पन्नास हजार राख्या पाठविण्यात आल्या होत्या तर दुसºया शहरातून सोलापुरात वितरित करण्यासाठी एक लाख तीस हजार राख्या आल्या होत्या, तर खासगी कुरिअरमार्फत तीन लाख राख्या पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा त्याकडे फारसा कल नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पोस्ट अन् खासगी कुरिअर कंपनीच्या सेवांवर परिणाम झाला आहे. सोशल मीडियावरील काही वेबसाईट आहेत. अशा वेबसाईटवर बहिणींना राख्या खरेदीवर सवलत देण्यात आली आहे. तुमचा भाऊ कितीही दूर अंतरावर राहत असल्यास त्याला ऑनलाइनद्वारे पाठवलेली राखी काही तासांच्या आतमध्ये भावाला मिळते. त्यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. अगदी एका क्लिकवर राखी मिळत आहे. राख्या हव्या त्या पत्त्यावर पाठवता येते. भावाने राखी बांधून घेतल्यानंतर त्याचीही आॅनलाईन भेट बहिणीला आॅनलाईनद्वारेच मिळते.
अशा आहेत ऑनलाइन राख्या...
कोरोनाचे संकट असलं तरीही यंदा देखील राख्यांच्या ट्रेंड्समध्ये वैविध्य पाहायला मिळत आहे. फॅन्सी, मोती, शिंपले, मोती, रुद्राक्ष, लॉकेट, भावाच्या फोटोसह, नावासह कस्टमाईज्ड राख्या ‘कूल ब्रो’, फूड राखी, ऑनलाइन गेम्स वेडे, प्लांटेबल सीड राख्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. राखीची लांबी काय, राखीवर कोणती कलाकृती साकारण्यात आली आहे, हे पाहता येईल.
डाक विभागाचे खास पाकीट
रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी डाक विभागही सरसावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राख्यांसाठी खास पाकिटे उपलब्ध करून देणाºया डाक विभागाने यंदाच्या पाकिटाचा आकार वाढविला असून, त्यावर ‘राखी पाकीट’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
दरवर्षी एक महिना अगोदरपासून राखी पाठवण्यात येतात, गेल्या वर्षी आम्ही साडेतीन लाख राख्या पाठवल्या होत्या, यंदा कोरोनामुळे राखी पाठवण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. दहा दिवस संचारबंदी असल्यामुळे राखी पाठविण्यावर जास्त परिणाम झाला आहे.
-रतन अमाने,
खासगी कुरिअर.