सोलापुरातील तुरूंगातही 'कोरोना' चा फैलाव; ८ कर्मचाºयांसह ५२ कैद्यांना कोरोनाची लागण
By appasaheb.patil | Published: June 6, 2020 11:27 AM2020-06-06T11:27:34+5:302020-06-06T11:31:19+5:30
महानगरपालिकेतर्फे उपचार सुरु; कारागृहातील न्यायाधीन बंदीसाठी स्वतंत्र कोव्हीड केअर सेंटर
सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत़ दरम्यान, जिल्हा कारागृहातही कोरोनाचा फैलाव झाला आहे़ आतापर्यंत कारागृहात ८ कर्मचाºयांसह ५२ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे़ सोलापुरातील कोरोना बाधितांंची संख्या ११०७ एवढी झाली असून आतापर्यंत ९४ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्हा कारागृहात ४०१ कैदी होते, त्यापैकी ८४ जणांना हायकोर्टाच्या आदेशानुसार पॅरोलवर सोडण्यात आले़ जेव्हा पहिला रूग्ण आढळला त्यावेळी ३१७ कैदी कारागृहात होते. शासकीय तंत्रनिकेतन येथे सोलापूर कारागृहातील न्यायाधीन बंदीसाठी स्वतंत्र कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमधील बंदी आणि कारागृह विभागाच्या कर्मचाºयांची चांगल्या प्रकारे देखभाल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यापुर्वीच दिल्या आहेत.
सोलापूर कारागृहातील न्यायाधीन बंदीवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आली आहे. त्याचबरोबर कारागृहातील कर्मचाºयांनाही लागण झाली आहे. या सर्वासाठी शासकीय तंत्रनिकेतन येथील अल्पसंख्यांक समाजातील मुलीच्या शासकीय वसतिगृहात खास कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. कारागृहातील इतर बंदीना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. कोविड सेंटरसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. येथे आवश्यक तो बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर महानगरपालिकेतर्फे उपचार सुरु आहेत.