कोरोना, वादळी पावसाच्या आपत्तीमध्ये वीजपुरवठ्यासाठी ‘प्रकाशदूतां’ची झुंज
By appasaheb.patil | Published: March 27, 2020 11:08 AM2020-03-27T11:08:54+5:302020-03-27T11:11:24+5:30
महावितरण; जनमित्रांनीही केली रात्रंदिवस सेवा, अखंडित वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज
सोलापूर : कोरोना विषाणूच्या आपत्तीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी काम करणाºया महावितरणच्या प्रकाशदूतांना अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांत मोठे आव्हान दिले. वादळी पावसाच्या थैमानामुळे सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता; मात्र महावितरणचे अभियंते आणि जनमित्रांनी युद्धपातळीवर व अविश्रांत वीजयंत्रणा दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिलेली झुंज यशस्वी केल्याची माहिती महावितरण सोलापूरचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सोलापूर जिल्ह्याच्या प्रामुख्याने सांगोला, अकलूज, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुका तसेच सोलापूर शहराच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांत जोरदार पावसाने वादळासह हजेरी दिली. त्याआधी दोन दिवस वाढलेल्या तापमानामुळे तापलेल्या वीजयंत्रणेवर या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आणि विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला.
जिल्ह्याच्या सांगोला, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यासह सोलापूर शहरामध्ये मंगळवारी (दि. २४) रात्रीच्या सुमारास आणि बुधवारी (दि. २५) माळशिरस तालुक्यातील विविध भागांसह प्रामुख्याने अकलूज परिसरामध्ये रात्री वादळासह जोराचा पाऊस झाला. यामध्ये ग्रामीण भागातील तीन उपकेंदे्र, २८ कृषीवाहिन्या व ९ गावठाण व वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर सोलापूर शहरातील दोन उपकेंदे्र व ११ केव्हीचे १० वीजवाहिन्यावरील वीज खंडित झाली होती. या वादळी पावसामुळे विविध ठिकाणी वीजयंत्रणेचे नुकसान झाले. वीजयंत्रणेवर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. त्यामुळे वीजखांब व तारा जमीनदोस्त झाल्या होत्या असेही महावितरणने सांगितले़
जेवणासाठीही मिळाली नाही उसंत...
- सोलापूर शहरात वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम करण्यात आले व मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बंद पडलेले उपकेंद्र सुरु करण्यात आले व वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. ग्रामीण भागात देखील बुधवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. कोरोनामुळे दुरुस्तीच्या इतर अतिरिक्त कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने जनमित्रांनी स्वत:च वीजयंत्रणेवर पडलेल्या फांद्या काढणे, वीजतारांना अडकलेले पत्रे काढणे, वीजखांब उभारणे, वीजतारा ओढणे इत्यादी सर्व कामे करण्यात आली. यामध्ये जेसीबी व ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. अत्यंत संकटकाळात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिगरबाज कामगिरी बजावली व महावितरणच्या ग्राहकसेवेचा प्रत्यय दिला. दुरुस्तीच्या कालावधीत काही ठिकाणी अभियंता व जनमित्रांना जेवणासाठी उसंत मिळू शकली नाही किंवा तशी सोयसुद्धा होऊ शकली नाही. पहाटेपासून कामावर असलेले अनेक अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरच बुधवारी रात्री उशिरा घरी परतले.
मुख्यत्वे वादळ व अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने प्रथमत: पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येत आहे; मात्र हा पर्याय नसल्यास वीज यंत्रणेची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
- ज्ञानदेव पडळकर, अधिक्षक अभियंता, महावितरण