कोरोना मृतांसाठी मनपा कर्मचारी ठरले अखेरचे सोबती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 04:06 PM2020-04-30T16:06:51+5:302020-04-30T16:11:41+5:30
सोलापुरात आजवर सहा जणांवर केले अंत्यसंस्कार;रात्री-अपरात्रीची, जीवाची पर्वा न करणारे मनपाचे कर्मचारी
राकेश कदम
सोलापूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोनाग्रस्त व्यक्तीवर सरकारी यंत्रणेकडून अंत्यसंस्कार करण्यात येतात. सोलापुरात आजवर सहा व्यक्तींचे निधन झाले. या मृतदेहांचे दहन आणि दफन करण्याचे काम मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले आणि त्यांच्या सहकाºयांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी रात्री-अपरात्रीची, जीवाची पर्वा केली नाही. मनपाचे कर्मचारी, अधिकारी मृत व्यक्तींचे अखेरचे सोबती ठरले आहेत.
कोरोनाग्रस्त व्यक्तीवर धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येतात. या अंत्यसंस्काराची जबाबदारी मनपावर सोपवण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक यापैकी एक-दोन लोकांना सोबत घेतले जाते. स्मशानात मनपाचे चार-पाच कर्मचारी, आरोग्य अधिकारी असतात. बाजूला पोलिसांची व्हॅन थांबलेली असते.
कोरोनाचा पहिला बळी ठरलेल्या व्यक्तीचे दफन करण्यात आले. त्यासाठी कर्मचाºयांनी स्मशानभूमीत जेसीबीने खड्डा खोदून घेतला. खड्ड्यात औषधे टाकून निर्जंतुकीकरण करुन घेतले. मृतदेहावर औषधांची फवारणी केली. कर्मचाºयांवर कोरोनाची दहशत होती. त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम आरोग्याधिकारी संतोष नवले, नागेश मेंडगुळे, नगरसेवक बाबा मिस्त्री आदींनी केले. दफन होईपर्यंत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त दीपक तावरे जागेच होते. त्यानंतर चार दिवसांनी आणखी एकाचे दफन करण्यात आले. चार मृतदेहांचे मोदी स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीत दहन करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य अधिकाºयांसह मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी, कल्याणी बिराजदार व इतर कर्मचारी हजर राहिले.
नातेवाईकांची अशीही भूमिका
च्काही मृत व्यक्तींच्या कुटुंबातील लोक सोबत येण्याचा हट्ट धरतात तर काही लोक तुमचे तुम्ही बघा, असेही सांगून टाकत आहेत. या मृतांसाठी मनपाचे अधिकारीच अखेरच्या प्रवासातील सोबती ठरले. अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत आयुक्त तावरे, उपायुक्त पवार यांच्यासह इतर अधिकारी सतत संपर्कात असतात.
पीपीई कीटचा एकदाच वापर
- अंत्यसंस्कार करताना मनपाचे अधिकारी, कर्मचारी पीपीई कीटचा वापर करतात. एकदाच या कीटचा वापर केला जातो. त्यानंतर पुन्हा नवे कीट घेतले जाते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमी परिसराचे औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले जाते.