कोरोना आला.. मसाल्याचा रुबाब वाढला तंदुरुस्तीसाठी जो तो काढा पिऊ लागला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:10+5:302021-08-20T04:27:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : अवघ्या जगाला हादरवून सोडणारा कोरोना आला अन् साऱ्यांचीची पळता भुई थोडी झाली. जो तो ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : अवघ्या जगाला हादरवून सोडणारा कोरोना आला अन् साऱ्यांचीची पळता भुई थोडी झाली. जो तो सांगतील ते उपाय करु लागले. या काळात मसाल्यांचा वापर करुन काढा घेण्याचे प्रमाण वाढले. यामुळेच की काय घराघरातील किचनमध्ये मसाल्याचा रुबाब वाढला. हा रुबाब कायमच आहे. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे दर स्थिर राहिले आहेत. आगामी दिवाळी सणामध्ये मात्र चिवडा, चकली अशा चमचमीत पदार्थांसाठी किंमती वाढू शकतात असा सूर व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
लाॅकडाऊन काळात पालेभाज्यांसह अनेक वस्तुंचे दर वाढले. तेलापासून ते अनेक पदार्थांचे दर वाढले. मात्र काळात औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्याचे दर स्थिर राहिले. लग्नसोहळ्यात केटर्सकडून थाळीचे दर वाढले. अगदी गॅसच्या दरात सध्या २५ रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे स्वयंपाकाची चवच महागल्याच्या प्रतिक्रिया गृहिणीतून उमटल्या. मात्र मसाल्याच्या स्थिर दराने काहीअंशी दिलासा दिला आहे.
-------
जिरे, काळीमिरी वगळता काही मसाल्याच्या काही पदार्थ ही बाहेर राज्यातून आयात होतात. औषधी गुणधर्म म्हणून त्याकडे पाहता येते. बहुतांश मसाल्याचे दर स्थिर असले तरी सण, उत्सव काळात याचा वापर वाढणार आहे. या काळात आहारतज्ज्ञांचा सल्लाही घेणार आहोत. केवळ मसाला नव्हे तर त्याला औषध म्हणूनच पाहू.
- सारिका काळोखे
------
लॉकडाऊन काळात सर्व व्यापारपेठा बंद होत्या. अनेकदा भडकलेल्या दरात पालेभाज्या घ्याव्या लागल्या. त्यापाठाेपाठ तेलाचे दरही वधारलेले अनुभवले. स्वयंपाकघरातील बहुतांश वस्तूंचे दर भडकलेले पाहिले. यातून मात्र केवळ लवंग आणि बदामफूल वगळता इतर मसाल्याच्या स्थिर दराने दिलासा दिला आहे.
- कल्पना चव्हाण
----
लॉकडाऊन काळात शरीरातील ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी बऱ्याचदा काढा तयार करताना काही मसाल्यांचा वापर झाला. मात्र यातून शरीरात उष्णता वाढत असल्याचे लक्षात आले आणि उलट वापर कमी केला. अतिवापर झाल्यास शरीराला यापासून काहीअंशी बाधा जाणवते. जसे फायदे तसे तोटेही आहेत. येथून मसाल्यांच्या वापरावर मर्यादाच ठेवू.
- नेहा हावळे
पाककला प्रेमी
----
सध्या मसाल्याचा तुटवडा नाही. मात्र मिरी आणि विलायची यांची कर्नाटकातील आरचीगिरीतून आणि पुणे मुंबईतून इतर मसाले मागविले जाताहेत. सध्या मसाल्याच्या दरवाढीवर नियंत्रण आहे. पुढील काळ हा सण उत्सवांचा असला तरी त्याची मागणी वाढू शकते, मात्र इतक्यात दर वाढणार नाहीत.
- नागनाथ अक्कलकोटे
मसाले व्यावसायिक
----
असे आहेत दर
मसाले पूर्वीचे दर सध्याचे दर
रामपत्री ८०० १४०० रु. किलो
काळीमिरी ५०० ५०० रु. किलो
जिरे २०० २०० रु. किलो
नाकेश्वरी १६०० १६०० रु. किलो
लवंग ७०० ८०० रु. किलो
जायपत्री २१०० २१०० रु. किलो
तमालपत्री १०० १०० रु. किलो
मोहरी ५० १०० रु. किलो
----