सोलापुरात कोरोनाची व्याप्ती वाढली, ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू; रुग्णांची संख्या १५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 01:14 PM2020-04-19T13:14:06+5:302020-04-19T13:21:51+5:30
दुसरा बळी.. पंधरावा रुग्ण ! पुण्याहून सोलापुरात आलेली वृद्ध महिला होती प्राध्यापकांची माता !
सोलापूर : शहरात कोरोना विषाणूची व्याप्ती वाढत चालली आहे. तेलंगी पाच्छा पेठ, रविवार पेठेत कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता ७० फूट रोड परिसरातील एका ६९ वर्षीय महिलेचा रविवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १५ झाली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असलेल्या सोलापूरचा आता रेड झोनमध्ये प्रवेश करीत आहे.
७० फूट रोड परिसरातील भारतरत्न इंदिरा गांधी नगर येथील रहिवाशी असलेल्या या महिलेला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सकाळी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. ही महिला एका प्राध्यापकाची माता असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले.
इंदिरा नगर परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे ७१८ संशयित रुग्ण आहेत. यापैकी ५०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १५ जणांचे रिपोर्ट पॉझीटिव्ह आले आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे.