कोरोनामुळे हाडाच्या शस्त्रक्रियेला होतोय उशीर; सोलापुरातील शासकीय रूग्णालयातील कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 06:12 PM2022-01-30T18:12:32+5:302022-01-30T18:12:38+5:30
सिव्हिल हॉस्पिटल : रोज होताहेत केवळ आठ शस्त्रक्रिया
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल) अस्थिरोग विभागात सध्या ७१ रुग्ण ॲडमिट आहेत. त्यांच्यावर औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र, कोरोनाची चाचणी व त्यानंतरचे उपचार यामुळे शस्त्रक्रियेस उशीर होत आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला, तर त्याच्यावर मेडिसिन विभागात उपचार करण्यात येतात. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा अस्थिरोग विभागात आणून शस्त्रक्रिया केली जात आहे. हाडाला फ्रॅक्चर, पण कोविड पॉझिटिव्ह असल्याने शस्त्रक्रियेसाठी थांबावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
शहर व परिसरात घडणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे सिव्हिलमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज सात ते आठ असे दर महिन्याला १५० ते २०० हाडांच्या शस्त्रक्रिया होत आहेत. जर रुग्ण वृद्ध रुग्ण असेल तर त्याच्या अधिक तपासण्या कराव्या लागतात. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेमध्ये अडचणी, आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, ॲप्रूव्हल वेळेवर न येणे, ॲप्रूव्ह रिजेक्ट होणे यामुळे शस्त्रक्रियेस उशीर होतो. शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक महिन्यातील तीन दिवस निर्जंतुकीकरण केले जाते. लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून घरी पाठविण्याला प्राधान्य असल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
-------
शस्त्रक्रिया पडली लांबणीवर
रुग्णालयातर्फे ऑपरेशनची तारीख आधी सांगण्यात आली. तशी तयारी केली होती. पण, अचानक गंभीर रुग्ण आल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. एकदा माझा रक्तदाब वाढून रक्तातील साखरही वाढली. माझ्या बाबतीत असे दोनदा घडले त्यामुळे शस्त्रक्रिया लांबणीवर पडली असे एका रुग्णाने सांगितले.