कोरोना कामकाजातून मास्तरांना केले कार्यमुक्त; महापालिका आयुक्तांनी काढला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 12:09 PM2021-07-02T12:09:33+5:302021-07-02T12:09:38+5:30
कोरोना काळात शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण मात्र सुरू आहे.
सोलापूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शिक्षकांना कोरोना कामांमध्ये सर्व्हेसाठी व आरोग्य सेवक यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले होते. सध्या रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे या सर्व शिक्षकांना कोरोना कामकाजातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश सोलापूर महानगरपालिका मनपा आयुक्तांनी काढले आहेत.
कोरोना काळात शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण मात्र सुरू आहे. यामुळे शिक्षकांना एकाच वेळी कोरोनाचे आणि शिक्षणाचे कामकाज पाहावे लागत होते. यामुळे शिक्षकांची धावपळ होत होती. तसेच रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ही शिक्षकांना कोरोना कामातून कार्यमुक्त करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार मागील वेळेस दहावी आणि बारावीतील शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना कोरोना कामातून कार्यमुक्त करण्यात आले होते. यानंतर एक जुलै रोजी मनपा उपायुक्तांनी नवीन आदेश काढत सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना कामकाजातून कार्यमुक्त केले आहे.
शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना कामकाजात दिलेले थर्मल गन व इतर साहित्य जमा करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयाचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.