कोरोनामुक्त झालेल्या सोलापूरकरांना ‘फ्रायब्रोसिस’ आजाराचा त्रास कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:59 PM2020-12-17T12:59:44+5:302020-12-17T12:59:51+5:30
पोस्ट कोविड ओपीडी : १४० पैकी दोघांनाच फायब्रोसिसची समस्या
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : कोरोना आजारात रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा संसर्ग दिसून येतो. आजारातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना फ्रायब्रोसिसचा त्रास होतो. मात्र, सोलापुरात खूप कमी जणांना असा त्रास झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला न्यूमोनिया झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये फ्रायब्रोसिसचा त्रास सुरू झाल्याचे आढळून येत आहे. या रुग्णांच्या रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आल्याचे तज्ज्ञ सांगतात. फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्साइड यांच्या अवागमनाची प्रक्रिया सुरू असते. त्यामध्ये त्रास व्हायला लागतो.
या रुग्णांना श्वास घेताना त्रास होणे, धाप लागणे, खोकला येणे, थकवा जाणवणे यांसह श्वसनाचा त्रास होतो. कोरोनाकाळात न्यूमोनिया असलेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाच्या उतींना क्षती पोहोचते. त्या ठिकाणी जाड व कठीण उतींमुळे फुफ्फुसाचे कार्य मंदावते. या काळात कोरडा खोकला, थकवा, अचानक वजन कमी होणे, नैराश्य यांसह काही लक्षणे व्यक्तीनुसार बदलत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये अशा रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येत आहे. खूप कमी सोलापूरकरांना फ्रायब्रोसिसचा त्रास होत असल्याचे येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
१४० जणांनी केली पोस्ट काेविड सेंटर तपासणी
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ओपीडीमध्ये आत्तापर्यंत १४० जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी फक्त दोन रुग्णांना फ्रायब्रोसीसचा त्रास झाला असून, त्यांची प्रकृती चांगली आहे.
पुुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्यास?
- - पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- - ताप येणे, शौचाला सारखे जावे लागणे, कोरडा खोकला, तोंडाची चव जाणे या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे.
- - पहिल्या पाच दिवसात लक्षणे आढळतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लगेच पोस्ट कोविड ओपीडी जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोरोना रुग्ण बरा होऊन जात असताना त्याची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येते. या तपासणीत फ्रायब्रोसिसचा संसर्ग असल्याचे कळते. काही रुग्णात उशिरा लक्षणे आढळू शकतात. आम्ही या रुग्णांच्या संपर्कात असतो. सोलापुरातील खूप कमी रुग्णांना हा त्रास असून, इतरांची तब्बेत ठणठणीत आहे.
- डॉ. लतीफ शेख, पोस्ट कोविड ओपीडी