कोरोनामुळे झेडपीच्या शाळा वर्षभरापासून कुलूपबंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:19 AM2021-04-03T04:19:04+5:302021-04-03T04:19:04+5:30
पूर्व नियोजनानुसार दरवर्षी साधारणतः १५ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषद शाळांमधील सर्व वर्गांच्या वार्षिक परीक्षा होतात. ...
पूर्व नियोजनानुसार दरवर्षी साधारणतः १५ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषद शाळांमधील सर्व वर्गांच्या वार्षिक परीक्षा होतात. त्यानंतर महाराष्ट्रदिनी १ मे रोजी परीक्षांचा निकाल जाहीर केला जातो. कोरोनाचा उद्रेक झाल्याने वार्षिक परीक्षांच्या पूर्व नियोजनाला गेल्या वर्षी पहिल्यांदाच खंड पडला होता. पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने यंदा सलग दुसऱ्यांदा याची पुनरावृत्ती होते की काय ? अशी शक्यता निर्माण झाली आहे.
२०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः अधोगतीचे ठरले आहे. ना ऑनलाइन ना ऑफलाइन सारेकाही चिडीचूप, असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे. खासगी शाळांच्या तुलनेत झेडपी शाळांची गुणवत्ता खरोखर वाखाणण्यासारखी आहे. त्यासाठी गुरुजींची अनेक वर्षांची मेहनत फळाला आली आहे. पण, कोरोना लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरल्याची चर्चा होत आहे.
४९२ शाळांमध्ये ६७ हजार ५५१ विद्यार्थी
सांगोला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३८९, माध्यमिक व उच्च माध्यमिक (अनुदानित) ६८, स्वयंअर्थसहाय्यित (विना अनुदानित) २४, खाजगी अनुदानित प्राथमिक ११ अशा ४९२ शाळा आहेत. या शाळांमध्ये इयत्ता पहिली ५५५८, इयत्ता दुसरी ५७९३, इयत्ता तिसरी ५९४७, इयत्ता चौथी ५९२६, इयत्ता पाचवी ५७०५, इयत्ता सहावी ५६६६, इयत्ता सातवी ५६२८, इयत्ता आठवी ५७४७, इयत्ता नववी ५५५८, इयत्ता दहावी ५७६३, इयत्ता अकरावी ५७६०, इयत्ता बारावी ४५०० असे एकूण ६७ हजार ५५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.