चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला ‘कोरोना’ची लागण; सोलापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:10 AM2020-05-26T11:10:56+5:302020-05-26T11:14:18+5:30
३१८ कैद्यांसह ६० कर्मचाºयांची होणार तपासणी; कारागृह अधीक्षकांनी केली महापालिकेकडे मागणी
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याला कोरोनाची बाधा झाली आहे त्यामुळे आतील ३१८ जणांची व ६० कर्मचाºयांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी महापालिकेच्या आरोग्याधिकाºयाकडे अधीक्षक डी.एस. इगवे यांनी केली आहे.
जिल्हा कारागृहात सुमारे ४७५ न्यायाधीन कैदी होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेत अटक असलेल्या न्यायाधीन कैद्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. आदेशावरून कारागृह अधीक्षकांनी सात वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या जेलमधील ७० न्यायाधीन कैद्यांना ४५ दिवसांच्या रजेवर सोडले आहे. प्रादुर्भाव वाढल्यास पुढे आणखी ३० दिवसांची वाढ करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जेलमध्ये कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात होती.
मार्च महिन्यात एकाला जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. गेल्या चार दिवसापर्यंत तो व्यवस्थित होता; मात्र त्याला अचानक ताप येण्यास सुरुवात झाली. कैद्याला ताप येत असल्याचे पाहून तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी कैद्याचा स्वॅब घेण्यात आला, रविवारी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कैद्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच खळबळ उडाली. दरम्यानच्या काळात तो कैदी अन्य किती जणांच्या संपर्कात आला होता. कर्मचारी संपर्कात आले होते का? याची माहिती घेण्यात येत आहे.
कारागृहातील अन्य लोकांना याची बाधा होऊ नये म्हणून अधीक्षक डी.एस. इगवे यांनी सोमवारी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांना तपासणी करण्याची मागणी केली आहे. कारागृहात सध्या ३१८ कैदी असून, ६0 कर्मचारी आहेत. सर्वांची तपासणी करण्यात यावी अशी विनंती केली आहे. मागणीनुसार मंगळवारपासून तपासणी होणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी आलेल्या कैद्याला बाधा कशी ?
- सोलापुरात जबरी चोरी केल्याप्रकरणी एकाला सदर बझार पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला न्यायालयाने कोठडी दिली होती. कोठडीनंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. दोन महिन्यापूर्वीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी तो कारागृहात आला होता. सध्या कारागृहात गंभीर गुन्ह्यातील आरोपीशिवाय नवीन कैद्याला घेतले जात नाही. यापूर्वी तर कारागृहात कोणालाही कोरोनाची लागण झाली नव्हती. असे असताना अचानक एका कैद्याला ताप आला आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? असा प्रश्न कारागृह प्रशासनाला पडला आहे.
कारागृहात पहिल्यापासून खूप काळजी घेतली जात आहे. आतमध्येही फिजिकल डिस्टन्स पाळला जात आहे. स्वच्छता पाळली जाते, असे असताना दोन महिन्यांपूर्वी कारागृहात आलेल्या न्यायाधीन कैद्याला कोरोनाची बाधा झाली कशी ? हे समजत नाही. याबाबत आम्ही सखोल माहिती घेत आहोत.
- डी. एस. इगवे,
अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, सोलापूर.