कोरोनाने नोकरी गेल्याने मोठ्यांची तर ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांची मोबाइलने उडवली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 12:48 PM2021-06-28T12:48:33+5:302021-06-28T12:49:39+5:30
तक्रारी वाढल्या ; झोपताना मोबाइल न पाहण्याचे डॉक्टरांचे आवाहन
सोलापूर : कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत, तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे मोठ्यांची झोप उडाली आहे, तर शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे मुलांचा मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे डोळ्यावर परिणाम होऊन लहान मुलांची झोप उडत आहे. परिणामी, डोळ्यांच्या तक्रारीबाबत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
कोरोना काळातच सगळ्यांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. अनेकांचे काम वर्क फ्रॉम होम सुरू आहे. तर शाळा मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या साहाय्याने सुरू आहेत. वर्क फ्रॉम होम असणाऱ्यांना आणि कॉल सेंटरवर काम करणाऱ्यांना सतत कॉम्प्युटर आणि मोबाइलचा आधार घ्यावा लागतो. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर ताण पडत आहे. सतत स्क्रीनकडे एकाग्रतेने पाहत असल्यामुळे डोळ्यावरील पापण्यांची ब्लिंकिंग रेट (उघडझाप होण्याची वेळ) कमी होत आहे. डोळ्यातील कोरडेपणामध्ये वाढ होत आहे. तसेच कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप डोळ्यांच्या योग्य त्या अंतरावर नसल्यामुळे मानेचे आणि शरीराचे अँगल चुकून त्यांचा त्रास वाढत आहे. शिवाय स्क्रीनचा वापरामुळे अति नील किरणांचा डोळ्यांवर पडत असल्यामुळे त्याचा झोपेवर परिणाम होत आहे.
सोबतच लहान मुले आपल्या समवयस्कर मित्रांना प्रत्यक्ष न भेटल्यामुळे, मैदानात खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. यातूनच त्यांची झोप कमी होत आहे. अनेक वेळा मुले रात्री अंधारात पांघरून घेऊन मोबाइल पाहत असतात. यावेळी त्यांच्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता जास्त असते.
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम
- १) एकाग्रता होत नाही.
- २) चिडचिड होते.
- ३) थकल्यासारखे वाटते.
- ४) डोकेदुखी वाढते.
- ५) ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
झोप का उडते?
- १) सतत मोबाइल किंवा अन्य स्क्रीनवर पाहत बसल्यामुळे डोळ्यावर ताण येतो. यामुळे झोप उडते.
- २) मानसिक ताण वाढल्यामुळे त्याचा परिणाम झोपेवर होतो.
- ३) शारीरिक व्यायाम कमी झाल्यामुळे.
- ४) अंधारात मोबाइलचा वापर वाढल्यामुळे.
नेमकी झोप किती हवी?
नवजात बाळ - दिवसातून वीस तास झोपलेले असतात.
- १ ते ५ वर्षे - १० ते ८ तास
- शाळेत जाणारी मुले - १० ते १२
- २१ ते ४० वर्षे - ०७
- ४१ ते ६० वर्षे - ०७
- ६१ पेक्षा जास्त - ०६ तास
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या नको
सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाचा मानसिक आणि शारीरिक ताण वाढत आहे. त्यामुळे अनेकांना झोपेच्या समस्या सतावत आहेत. यामुळे अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या घेतात. झोपेच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास त्यातून मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
चांगली झोप यावी म्हणून
- १) रात्री झोपण्याच्या तीन तासांपर्यंत टीव्ही, मोबाइल पाहू नये.
- २) दररोज शारीरिक व्यायाम करणे गरजेचे.
- ३) चांगले आहार घेतल्यास झोपेस मदत होते.
- ४) घाम येणारा व्यायाम करावा, रात्री झोपताना मोबाइल पाहू नये, रात्रीचे जेवण आठच्या अगोदर घेतले पाहिजे, लहान मुले झोपताना, टीव्हीचा आवाज कमी ठेवावा, शक्यतो नॅचरल पद्धतीने झोप घ्यावे. (गोळ्या विना)
चांगल्या आरोग्यासाठी झोपेची गरज असते. यामुळे झोपेच्या अगोदर दोन ते तीन तास मोबाइल किंवा कोणत्याही प्रकारचा स्क्रीन टाळावा. आयटी प्रोफेशनलमध्ये असलेल्यांना व प्रौढ व्यक्तींना दिवसातून कमीत कमी सात तास झोप घेणे आवश्यक असते. स्क्रीनचे वापरामध्ये जे अतिनील किरणांचा डोळ्यांवर परिणाम होतो. यामुळे दृष्टिदोष निर्माण होऊ शकतात.
-डॉ. उमा प्रधान, नेत्रतज्ज्ञ
स्क्रीनचा वापर शक्यतो टाळणे गरजेचे आहे. जर काही कारणाने ते टाळू न शकल्यास स्क्रीनचे ब्राइटनेस आणि कॉन्ट्रॅस कमी ठेवावे. तसेच सलग स्क्रीनवर काम असल्यास प्रत्येक एक ते दीड तासानंतर स्क्रीनपासून लांब जाऊन लांब अंतरावरची एखादी वस्तू एकाग्रतेने पाहावी. यामुळे डोळ्यांच्या पापण्या योग्यरीतीने उघडझाप होतात. यातून कर्नियाला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो.
-डॉ. क्षितिजा पैके, नेत्रतज्ज्ञ