शंभरीच्या उंबरठ्यावरील शेटफळच्या आजोबानं कोरोनाला हरवलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:14+5:302021-04-29T04:17:14+5:30
करमाळा : वय वर्षे ९८.. तरीही तंदुरुस्त.. अन् धडधाकट. पण अवचित क्षणी या आजोबांना कोरोनानं गाठलं. पण ते डगमले ...
करमाळा : वय वर्षे ९८.. तरीही तंदुरुस्त.. अन् धडधाकट. पण अवचित क्षणी या आजोबांना कोरोनानं गाठलं. पण ते डगमले नाही. जगण्याची जबरदस्त आकांक्षा आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही रेमडेसिविर अथवा ऑक्सिजनचा टेकू न घेता त्यांनी कोरोनावर मात केली आहे. शेटफळचे प्रल्हाद रामचंद्र पोळ त्यांचं नाव.
शेटफळ (ना. ता. करमाळा) येथील प्रल्हाद रामचंद्र पोळ यांना लहानपणापासून व्यायामाची व वाचनाची आवड आहे. आजही ते नियमितपणे दररोज व्यायाम करतात. या वयातही त्यांना कोणताही आजार नाही. चष्म्याशिवाय पुस्तक व वर्तमानपत्रे वाचू शकतात. सर्व दातही अगदी मजबूत असल्याने स्वतः ऊस सोलून खातात. आजही शेतातील किरकोळ कामे व गुरे सांभाळण्याचे काम करतात.
शेतातील घरापासून दररोज नित्यनियमाने चालत गावात येऊन देवदर्शन करतात. मात्र, १५ एप्रिल रोजी त्यांच्या अंगात थोडासा ताप भरला. तोंडाला चव नसल्याने त्यांचा नातू ज्ञानेश्वर याने जेऊर येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले. लक्षणांवरून डॉक्टरांनी कोविड टेस्ट करण्यास सांगितले. टेस्ट पॉझिटिव्ह आली. घरच्या सर्वांना त्यांची काळजी वाटू लागली. उपचारासाठी खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. इतर टेस्ट नॉर्मल आल्या, तर स्कोअरही फार नव्हता, परंतु वय जादा असल्याने काळजी वाटत होती. डॉ. किरण मंगवडे, डॉ. संदीप नाईकनवरे, डॉ. हर्षवर्धन गायकवाड यांनी त्यांच्यावर उपचार केले. आणि त्यांनी कोरोनावर मात केली.
डाॅक्टरांनाच द्यायचे धीर
उपचार सुरू असताना मला काही होत नाही, तुम्ही काळजी करू नका, म्हणत खुद्द डॉक्टरांना व शेजारच्या इतर रुग्णांना धीर देण्याचे काम ते करत. दहा दिवस त्यांच्यावर कोविडचे नियमित उपचार केले. उपचाराला त्यांच्या शरीराने साथही दिली. रेमडेसिविर इंजेक्शन अथवा कृत्रिम ऑक्सिजनची गरजच त्यांना पडली नाही. आज ते ठणठणीत बरे होऊन घरी गृहविलगीकरणात आहेत. जवळचे नातेवाईक भेटायला आले, तर तुम्ही लांब अंतरावरच थांबा, हा आजार फार वाईट आहे, काळजी घ्या, मास्क लावा, असा सल्ला देतात.
फोटो
२८प्रल्हाद पोळ